Delhi Crime: गेल्या काही दिवसांमधून हत्येची विविध प्रकरणं समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे. मेरठच्या सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी हिने प्रियकरासह मिळून त्याची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर हत्येची अनेक धक्कादायक प्रकरणं उघडकीस आली आहेत. अशातच दिल्लीतून हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. दिल्लीच्या विवेक विहार परिसरातील एका घरात बेडमध्ये महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला. दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला असता हा सगळा प्रकार समोर आला.
शुक्रवारी दिल्लीच्या विवेक विहार पोलीस स्टेशन परिसरातल्या एका घरातून रक्त वाहू लागल्याने खळबळ उडाली. विवेक विहारमधील सत्यम एन्क्लेव्हमध्ये असलेल्या डीडीए फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. घराला बाहेरून कुलूप होते पण मागच्या दारातून रक्त वाहत होते. दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांना ३५ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. मृतदेह एका पिशवीत गुंडाळून बेडमध्ये लपवला होता.
पोलिसांनी घरमालक विवेकानंद मिश्रा याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. शाहदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी विवेक विहार पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला होता, ज्यामध्ये सत्यम एन्क्लेव्हच्या डीडीए फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅटला बाहेरून कुलूप होते, मात्र मागील दरवाजाजवळ रक्ताच्या खुणा दिसल्या. त्यामुळे संशय बळावला. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिले तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. बेडीमध्ये एका महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवण्यात आला होता जो पूर्णपणे कुजलेला होता.
"आम्हाला ४.३७ वाजता फोन आला की घरातून दुर्गंधी येत आहे. घराचे मालक विवेकानंद मिश्रा असून त्यांचे वय ५०-६० वर्षे आहे. घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला, तो एका पिशवीत ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता. पिशवी एका पेटीच्या आत होती आणि त्यावर अगरबत्ती लावली होती. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, कायदेशीर कारवाई सुरू आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त नेहा यादव यांनी दिली.
महिलेचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून लाकडी पेटीत लपवून ठेवला होता, जेणेकरून त्याचा वास येऊ नये. मात्र मृतदेह कुजून त्यातून रक्त वाहत होते. महिलेचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होता. मात्र मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे हे प्रकरण उघडकीस आलं.
महिलेच्या मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून प्लास्टिकमध्ये गुंडाळून बेडमध्ये लपवून ठेवला होता. मात्र मृतदेह कुजून त्यातून रक्त वाहत होते. महिलेचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होता. मात्र मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे हे प्रकरण उघडकीस आलं. दरम्यान, शेजाऱ्याने सांगितले की विवेकानंद मिश्रा ट्यूशन चालवत होता. अनेक दिवसांपासून त्याच्या घरातून दुर्गंधी येत होती. याची तक्रार केली असता त्याने उंदीर मेला असल्याचे सांगितले. पण जेव्हा दुर्गंधीचे प्रमाण वाढलं तेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.