भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाण्यांवर हल्ला चढविलेला असताना पाकिस्तानने भारताच्या रहिवासी आणि सैन्याच्या ठिकाणांवर जोरदार हल्ला चढविला आहे. आत्मघाती ड्रोन आणि फायटर जेटद्वारे पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमनी ती फोल ठरविली असून आज पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी सीडीएस आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक सुरु केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी आणि एनएसए अजित डोवाल देखील चर्चा करत आहेत.
पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करून आगळीक केली आहे. यामुळे भारत आता पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर लाहोरवर मिसाईल डागली आहेत. पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर सतत होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान, यावेळी भारतीय सैन्याने अचूक प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली आहे. दोन्ही बाजूंमध्ये तोफखाना आणि रॉकेटचा जोरदार मारा केला जात आहे.
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील सुईगम आणि वाव भागातील सीमावर्ती गावांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. पंजाबमधील जालंधर येथील सुरानुसी ऑर्डनन्स फॅक्टरीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. जालंधर येथील आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेजवळ ते रोखण्यात आले, ज्यामुळे मोठा हल्ला टळला. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा जोरदार तोफांचा मारा सुरू आहे.