प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास आणखी मुदतवाढ मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 07:01 IST2020-12-29T02:04:32+5:302020-12-29T07:01:43+5:30
कोरोना कहरामुळे केंद्र सरकारने विवरणपत्रे सादर करण्याची मुदत ३१ जुलैऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवून दिली होती.

प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास आणखी मुदतवाढ मिळणार?
नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटी रिटर्न) सादर करण्याची वाढीव मुदत गुरुवारी, ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. मात्र, आतापर्यंत सव्वापाच कोटी करदात्यांपैकी चार कोटी लोकांनीच विवरणपत्रे दाखल केली आहेत. देशातील सुमारे ४१ टक्के छोट्या व मध्यम व्यापारी, तसेच उद्योजकांनी अद्याप विवरणपत्रे सादर केलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर विवरणपत्र दाखल करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
कोरोना कहरामुळे केंद्र सरकारने विवरणपत्रे सादर करण्याची मुदत ३१ जुलैऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवून दिली होती. वेळेत विवरणपत्रे दाखल न केल्यास अधिक उत्पन्न असलेल्यांना दंड भरावा लागणार आहे. मात्र, आमच्या आर्थिक व्यवहारांची दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने व नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे विवरणपत्रे सादर करण्यासाठी सरकारने २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ४० टक्के व्यापारी व मध्यम उद्योजकांनी केली आहे. मात्र, केंद्राने अद्याप त्यासंदर्भात निर्णय घेतला नसल्याने व्यापारीवर्ग धास्तावला आहे.