अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 05:43 IST2025-07-17T05:43:04+5:302025-07-17T05:43:18+5:30

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणण्याची मागणी विरोधक करीत आहेत.

Will the session be successful? Opposition will create a dilemma; Opposition parties including Congress are starting to coordinate issues | अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू

अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारची चौफेर कोंडी करण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष मुद्द्यांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी नुकतीच पक्षाच्या नेत्यांशी या मुद्द्यावर चर्चा केली होती.

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणण्याची मागणी विरोधक करीत आहेत. तर, सत्ताधारी पक्ष हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगून टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांची पुनरीक्षण मोहीम, ओडिशातील एका विद्यार्थिनीवरील अत्याचार असे कितीतरी मुद्दे विरोधकांच्या हाती आहेत.

 हे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी २१ जुलैपासून सुरू होऊन २१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदेच्या लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहांत कामकाजाचे २१ दिवस असतील. १२ ते १८ ऑगस्टदरम्यान रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन यामुळे सुट्टी असणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी भाजप व काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीमध्ये विविध मुद्द्यांवर मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. 

विरोधकांकडे हे मुद्दे 
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धात केलेली मध्यस्थी, बिहारमधील मतदार याद्यांची पुनरीक्षण मोहीम, अहमदाबाद विमान दुर्घटना, ओडिशात एका विद्यार्थिनीवर अत्याचार असे अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती आहेत.

आठ नवीन विधेयके
मणिपूर वस्तू आणि सेवा कर (सुधारणा) विधेयक, सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था विधेयक, भारतीय व्यवस्थापन संस्था (सुधारणा) विधेयक, कर आकारणी कायदा (सुधारणा) विधेयक, भू-वारसा स्थळे आणि भू-अवशेष विधेयक, खाण सुधारणा विधेयक, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी (सुधारणा) विधेयकांचा समावेश आहे. 

Web Title: Will the session be successful? Opposition will create a dilemma; Opposition parties including Congress are starting to coordinate issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.