भोपाळ: काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. सिंधिया यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामे दिल्यानं राज्यातलं काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात जोरदार सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. वीसपेक्षा अधिक आमदारांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेस सरकार कोसळल्यात जमा आहे. मात्र मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या एका दाव्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. काठावरचं बहुमत असलेलं सरकार चालवणाऱ्या कमलनाथ यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना बहुमत सिद्ध करण्याचा दावा केला. 'चिंता करण्याची, घाबरण्याची गरज नाही. आम्ही बहुमत सिद्ध करू. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. ज्या आमदारांना त्यांनी कैद केलं आहे, ते माझ्या संपर्कात आहेत,' असं कमलनाथ यांनी म्हटलं. त्यामुळे राज्यातलं सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस कामाला लागल्याचं दिसत आहे. मुकूल वासनिक, दीपक बावरिया आणि हरिश रावत यांना पक्ष नेतृत्त्वानं दिल्लीहून भोपाळला पाठवलं आहे. तर भाजपानं त्यांच्या सर्व आमदारांना हरयाणातल्या गुरुग्राममधल्या आयटीसी ग्रँड भारत हॉटेलमध्ये हलवलं आहे. भाजपा नेते गोपाल भार्गव यांनी राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या १९ आमदारांची यादी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवली. या बैठकीला ९४ पेक्षा अधिक आमदार उपस्थित होते, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या बैठकीनंतर भाजपानं लगेचच त्यांच्या सर्व आमदारांना भोपाळमध्ये येण्याचे आदेश दिले. या आमदारांना दिल्लीला पाठवण्यात येणार होतं. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हे आमदार हरयाणातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं.
आता त्यांचे आमदार माझ्या संपर्कात; मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दाव्यानं एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 07:58 IST
Madhya Pradesh Political Crisis: भाजपाला आमदार फुटण्याची भीती; सर्व आमदारांना भोपाळमधून हरयाणात हलवलं
आता त्यांचे आमदार माझ्या संपर्कात; मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दाव्यानं एकच खळबळ
ठळक मुद्देभाजपानं आमदारांना भोपाळहून हरयाणात हलवलंसरकार बहुमत सिद्ध करेल; मुख्यमंत्री कमलनाथ यांना विश्वासमध्य प्रदेशात सत्ता संघर्ष शिगेला; काँग्रेसचे बडे नेते भोपाळमध्ये दाखल