प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:48 IST2025-11-12T09:43:38+5:302025-11-12T09:48:35+5:30
Bihar Assembly Election 2025 Exit Poll: १४ नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
Bihar Assembly Election 2025 Exit Poll: देशाच्या राजकारणाला अभूतपूर्व वळण लावणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-जनता दल युनायटेड-लोक जनशक्ती पार्टी यांच्या एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले दिसत असून राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यांची महाआघाडी व प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला अनपेक्षित असा मोठ्या पराभवाचा फटका बसल्याचे चित्र आहे. एक्झिट पोलसारखे प्रत्यक्ष निकाल लागल्यास बिहारची जनता नितीश कुमार यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येईल. १४ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच
गेल्या निवडणुकीत एनडीएला १२५, महाआघाडीला ११० आणि इतरांना ८ जागा मिळाल्या होत्या. याचा अर्थ असा की, यावेळी एनडीएला अंदाजे २९ जागांचा फायदा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला २८ जागा कमी मिळण्याचा अंदाज आहे. चाणक्यचा अंदाज आहे की, एनडीए १३० ते १३८ जागा जिंकेल. चाणक्यच्या सर्वेक्षणात महाआघाडीला १०० ते १०८ जागा मिळतील, असा अंदाज आहे. इतरांना ३ ते ५ जागा मिळू शकतात.
जनसुराज्य पक्षाबाबत एक्झिट पोल कसा?
पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला ३ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. बिहार निवडणुकीत राजकारणी म्हणून उदयास आलेल्या प्रशांत किशोर यांच्यावर सर्वांचे लक्ष होते. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार किशोर जास्तीत जास्त पाच जागा जिंकू शकतात. पीपल्स पल्सच्या मते, प्रशांत किशोर यांचे जनसुराज्य पक्षाला शून्य ते पाच जागांवर विजय मिळवू शकतात. पीपल्स पल्स व्यतिरिक्त, इतर कोणत्याही एजन्सीने जनसुराज्य पक्षाला इतक्या जागा दिलेल्या नाहीत. चाणक्य स्ट्रॅटेजीने जनसुराज्य पक्षाला एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला आहे.
दरम्यान, जर एक्झिट पोलचे भाकित खरे ठरले तर ते एका प्रकारे प्रशांत किशोर यांच्या भाकितावर शिक्कामोर्तब होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, प्रशांत किशोर यांनी सांगितले की, त्यांचा जनसुराज्य पक्षाला एकतर १० पेक्षा कमी जागा जिंकेल किंवा १५० पेक्षा जास्त जागा जिंकेल.