"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:11 IST2025-05-03T15:05:04+5:302025-05-03T15:11:22+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
PM Narendra Modi: पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाण नागरिकांची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जातेय. जगभरातूनही यासाठी भारताला पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सोडणार नसल्याचे म्हटलं आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर आणि निर्णायक कारवाई करू असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मॅन्युएल गोन्साल्विस लॉरेन्को यांची भेट घेतली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठकही घेत दहशतवादाच्या मुद्द्यावरुन चर्चा केली. मी राष्ट्रपती लोरेन्सू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात मनापासून स्वागत करतो. हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
३८ वर्षांनंतर अंगोलाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे भारत-अँगोला संबंधांना नवी दिशा आणि गती तर मिळतेच, शिवाय भारत-आफ्रिकेची भागीदारीही बळकट होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे यावर आमचे एकमत आहे, असेही म्हटलं.
"दहशतवाद्यांवर पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. सीमापार दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे यावर आमचे एकमत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल राष्ट्रपती लॉरेन्को आणि अंगोला यांनी व्यक्त केलेल्या शोकसंवेदनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगोलामध्ये लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी २०० दशलक्ष डॉलर्सच्या संरक्षण कर्जाला मान्यता दिली आहे. याशिवाय, संरक्षण प्लॅटफॉर्मची दुरुस्ती आणि पुरवठा यावरही करार झाला आहे. "अंगोलाच्या सशस्त्र दलांच्या प्रशिक्षणात मदत करण्यास आम्हाला आनंद होईल. आम्ही अंगोलाला डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, अंतराळ तंत्रज्ञान आणि क्षमता बांधणीमध्ये देखील मदत करू," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.