Will Go To Detention Camp says rajasthan cm Ashok Gehlot opposes nrc caa | ...तर सर्वात आधी मीच डिटेन्शन सेंटरमध्ये जाईन- मुख्यमंत्री
...तर सर्वात आधी मीच डिटेन्शन सेंटरमध्ये जाईन- मुख्यमंत्री

जयपूर: सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व्यवहार्य नसल्याचं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. कोणालाही डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. डिटेन्शन सेंटरमध्ये जाण्याची वेळ आलीच, तर त्यावेळी सर्वात पुढे मीच असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आम्हाला मान्य नाही, असं म्हणत गेहलोत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस देशवासीयांसोबत असल्यानं चिंता करण्याचं कारण नाही, असंदेखील ते म्हणाले. राजस्थानची राजधानी जयपूरमधल्या शहीद स्मारक परिसरात सीएए, एनआरसी विरोधात आंदोलन सुरू आहे. काल रात्री गेहलोत आंदोलनस्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देत त्यांनी भाजपावर टीका केली. 'दिल्लीत दोन दिवसांपूर्वी काय झालं याची सगळ्यांना कल्पना आहे. केंद्रीय मंत्री आणि यांचे (भाजपाचे) सगळे मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. नीतिश कुमारही गेले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भावना भडकावण्यासाठी तिथे जाऊन आले. मात्र दिल्लीकरांनी त्यांना शिकवलेला धडा इतिहास लक्षात ठेवेल,' असं गहलोत म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ ८ जागा मिळाल्या. तर आम आदमी पार्टीनं ७० पैकी ६२ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली. 

Web Title: Will Go To Detention Camp says rajasthan cm Ashok Gehlot opposes nrc caa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.