Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे नार्वेकरांना भेटणार का? ठाकरेंच्या दूतांना ली मेरिडीअनबाहेरच रोखले, एकाच गाडीला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:09 IST2022-06-21T16:40:11+5:302022-06-21T17:09:57+5:30
भाजपाचे आमदार संजय कुटे दोन तास आधीच सूरतला पोहोचले होते. त्यांनी शिंदेंची भेट घेतली होती.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे नार्वेकरांना भेटणार का? ठाकरेंच्या दूतांना ली मेरिडीअनबाहेरच रोखले, एकाच गाडीला प्रवेश
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेने शिंदे यांना विधानसभेतील गटनेते पदावरून हटविले आहे. हे सारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दोन दूत सूरतच्या वाटेवर असताना झाले आहे. यामुळे आता शिंदे मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना भेट देणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भाजपाचे आमदार संजय कुटे दोन तास आधीच सूरतला पोहोचले होते. त्यांनी शिंदेंची भेट घेतली होती. त्यापूर्वी त्यांनाही पोलिसांनी हॉटेलमपासून १०० मीटर अंतरावर अडविले होते. यानंतर फोनाफोनी झाल्यावर त्यांना आत सोडले होते.
आता मिलिंद नार्वेकर यांच्या गाड्यांचा ताफा देखील हॉटेलच्या प्रवेशद्वारावर थांबविण्यात आला आहे. आतमध्ये जाऊ दिले जात नाहीय. नार्वेकर आणि फाटक यांच्या गाड्या तिथेच बराच वेळापासून थांबून आहेत. शिंदे यांनी परवानगी दिली तरच त्यांना आत सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मिलिंद नार्वेकरांच्या एकाच गाडीला आतमध्ये जाऊ देण्यात आले आहे. अन्य चार गाड्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी दहा मिनिटे नार्वेकरांना बाहेर ताटकळत ठेवण्यात आले होते. नार्वेकर पोलिसांना हाताने बाजुला होण्यास सांगत होते. अखेर पोलिसांनी नार्वेकरांचीच गाडी आत सोडली. मात्र, आतमध्ये शिंदेंची भेट होणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही.