विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:10 IST2025-07-09T06:10:53+5:302025-07-09T06:10:53+5:30
डीजीसीएने विमान तिकिटांच्या वाढत्या दरावर नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील, अशी हमी दिली.

विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
नवी दिल्ली : महाकुंभ आणि पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतरच्या स्थितीत विमान तिकिटांच्या दरात झालेली भरमसाठ वाढ रोखण्यासाठी एक विशिष्ट व्यवस्था लागू करण्याची हमी नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) मंगळवारी लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली.
या बैठकीत अहमदाबादेत विमान अपघाताबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महासंचालक कॅम्पबेल विल्सन यांनी बैठकीत सांगितले की, एअर इंडिया विमानातील आसने व अन्य सुविधांबद्दल होणाऱ्या तक्रारी दूर करण्यासाठी आपल्या ताफ्यातील विमानांची दुरुस्ती दोन वर्षांत पूर्ण करेल.
मार्गदर्शक तत्त्वे लागू करू
समितीच्या सदस्यांनी विमान प्रवासातील सुरक्षेसह सुविधांबाबत तीव्र भावना मांडून विमान वाहतूक नियामक म्हणून डीजीसीएला अधिकार असल्याचे या बैठकीत ठासून सांगितले. त्यावर डीजीसीएने विमान तिकिटांच्या वाढत्या दरावर नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील, अशी हमी दिली.
ऑडिट करा सदस्यांची मागणी
काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील लोकलेखा समितीच्या काही सदस्यांनी या विमान सेवेअंतर्गत सुरक्षाविषयक अनेक घटनांचा उल्लेख करून विमान सुरक्षा ब्युरोच्या माध्यमातून ऑडिट करण्याची मागणी केली.