भीक मागेन, पण केंद्राकडे जाणार नाही; ममता बॅनर्जींचा कोलकात्याच्या जाहीर सभेत केंद्राला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 06:44 IST2023-04-15T06:44:26+5:302023-04-15T06:44:47+5:30
‘लोकांनी माझ्याबद्दल कधीही गैरसमज करून घेऊ नये, असे मला वाटत असते. कधी कधी आम्हाला निधी दिला जातो, कधी कधी नाही.

भीक मागेन, पण केंद्राकडे जाणार नाही; ममता बॅनर्जींचा कोलकात्याच्या जाहीर सभेत केंद्राला टोला
कोलकाता :
‘लोकांनी माझ्याबद्दल कधीही गैरसमज करून घेऊ नये, असे मला वाटत असते. कधी कधी आम्हाला निधी दिला जातो, कधी कधी नाही. आता २०२४ पर्यंत आम्हाला काहीही दिले जाणार नाही, असे सध्या ऐकायला मिळत आहे. गरज पडली तर मी साडी पसरून माता-भगिनींसमोर भीक मागेन, पण कधीच भीक मागायला दिल्लीत जाणार नाही,’ असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे एका जाहीर सभेत केंद्र सरकारला लावला.
यापूर्वी केंद्र सरकार १०० दिवस काम योजना व इतर योजनांसाठी निधी देत नाही, अर्थसंकल्पातही मनरेगा वगृहनिर्माण योजनेसाठी एक रुपयाही देण्यात आलेला नाही, असा आरोप करीत ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलन केले होते. त्याआधी दिल्लीतील आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार होत्या.
बंगालचे केंद्राचे ७ हजार कोटी रुपये थकीत
ममता म्हणाल्या की, केंद्र सरकारचे राज्याचे ७ हजार कोटी रुपये देणे बाकी आहे. यापूर्वीची थकबाकीही सरकारने दिली नाही. ५५ लाख घरांच्या बांधकामासाठीच्या गृहनिर्माण योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. १२ हजार गावांमधील खराब रस्त्यांची दुरुस्ती आम्ही करत आहोत. हे सर्व मी माझ्याच पैशाने करत आहे.