युतीचे जागावाटप होणार दिल्लीत!
By Admin | Updated: July 2, 2014 04:30 IST2014-07-02T04:30:33+5:302014-07-02T04:30:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूत्रानुसार महाराष्ट्रात युतीचे जागावाटप होणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

युतीचे जागावाटप होणार दिल्लीत!
रघुनाथ पांडे , नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूत्रानुसार महाराष्ट्रात युतीचे जागावाटप होणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेची युती कितीही अभंग असली तरी, जागावाटपात या वेळी ११९पेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाला वाटाघाटी करताना आक्रमक राहा, असे सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपाने जास्तीतजास्त जागा मागाव्या, त्या मिळेस्तोवर अडून बसावे, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
आठवड्याभरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजधानीत येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. ते लांबलेला पावसाळा व उपाययोजना याविषयी पंतप्रधानांची भेट घेणार असले तरी, काही वेळ राजकीय चर्चेसाठी ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. २५ जुलैच्या आत वाटाघाटीची पहिली बैठक मुंबईत होत आहे. त्यानंतरच्या साऱ्या घडामोडींचे केंद्र दिल्ली असेल. यापूर्वीच्या निवडणुकांतही शिवसेनेने दिल्लीशी बोलूनच जागावाटपाच्या चर्चेला अंतिम स्वरूप दिले होते. त्यामुळे शिवसेनेची ही सवय मोडायची नाही, असेही ठरविण्यात आल्याचे समजते. ताज्या हालचालीनुसार, १५ आॅगस्टपर्यंत भाजपाचे सर्व उमेदवार जाहीर होतील. पण तत्पूर्वी पक्षाच्या विद्यमान आमदारांचे ‘परफॉर्मिंग आॅडिट’ सुरू असून, त्या आधारावर उमेदवारीचा निर्णय होणार आहे. त्यामुळे नवे चेहरे असतील, असे सांगण्यात येते. युतीमध्ये नव्याने दाखल झालेले मित्र पक्ष आपल्या राजकीय वकुबापेक्षा अधिक जागा मागत आहेत. राज्यात शिवसेनेपेक्षा अधिक ताकद असून, गेल्या वेळचे ११९ भाजपा व १६९ शिवसेना हे सूत्र यंदाच्या जागावाटपात गुंडाळले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. युतीच्या नव्या मित्रांनी अधिक जागा मागण्याची सुरू केलेली भाषा मोडून काढण्याच्या तयारीतही राहा, ताकदीनुसारच त्यांना बळ द्या, असेही प्रदेशातील वरिष्ठांना केंद्रातून सांगण्यात आल्याचे सूत्राचे मत आहे.