भिलाई - पती बेरोजगार असल्याची सतत थट्टा करणे किंवा टोमणे मारणे, ही मानसिक क्रूरता आहे, असा महत्त्वाचा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ५२ वर्षीय पतीला घटस्फोट मंजूर झाला.
न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्यायमूर्ती अमितेंद्र किशोर प्रसाद यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, “पती-पत्नीमधील अवास्तव मागण्या, सततची भांडणे किंवा अपमानास्पद वर्तन, ही मानसिक क्रूरताच आहे आणि अशा परिस्थितीत घटस्फोट दिला जाऊ शकतो.” पत्नीला उच्च पदाची नोकरी मिळाल्यानंतर तिचे वागणे बदलले.
नेमके काय झाले?अनिल कुमार सोनमणी यांचा विवाह १९९६मध्ये भिलाई येथे झाला होता. दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पत्नीने मुख्याध्यापिका म्हणून उच्च पदस्थ नोकरी मिळवली. त्यानंतर तिच्या वागण्यात बदल झाला.
कोरोना काळात अपमानसोनमणी पेशाने वकील आहेत. कोरोना महासाथीत न्यायालये बंद झाल्याने कामकाज ठप्प झाले. त्या काळात पत्नीने त्यांना सतत ‘बेरोजगार’ म्हणून टोमणे मारले, अवास्तव मागण्या केल्या आणि किरकोळ कारणांवरून भांडणे केली. खंडपीठाने घटस्फोट देताना निरीक्षण नोंदवले की, “पत्नीने पतीचा अपमान केला, वारंवार टोमणे मारले आणि छोट्या कारणांवरून वाद घातले, अवास्तव मागण्या केल्या. हे सर्व वर्तन मानसिक क्रूरतेत मोडते.”
पत्नीने घर सोडले परिस्थिती २०२०मध्ये अधिक बिघडली. पत्नीने १९ वर्षीय मुलीला घेऊन घर सोडले, तर १६ वर्षीय मुलाला पतीकडे सोडून दिले.एवढेच नव्हे तर तिने पती आणि मुलासोबत सर्व संबंध तोडत असल्याचे पत्र लिहून भिलाई पोलिस ठाण्यातजमा केले. निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, नोटीस देऊनही पत्नी न्यायालयात हजर झाली नाही, तसेच कोणताही प्रत्युत्तर अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे पतीच्या बाजूने घटस्फोट मंजूर करण्यात आला.