Karnataka DGP Murder: कर्नाटकचे माजी पोलीस प्रमुख ओम प्रकाश यांच्या हत्येने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. माजी पोलीस महासंचालकांच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पल्लवी यांच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओम प्रकाश रविवारी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले होते. ६८ वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार करुन अनेख जखमा करण्यात आल्या होत्या आणि त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जेवणाऱ्या ताटावरच वाद झाल्यानंतर पत्नीने ओम प्रकाश यांच्यावर हल्ला करुन त्यांना संपवल्याची माहिती समोर आली आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांचे पत्नीसोबत संपत्तीवरुन वाद सुरू होते. ओम प्रकाश हे जेवणाच्या टेबलावर जेवण करत असतानाच त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ओम प्रकाश यांच्या प्लेटमध्ये दोन प्रकारचे मासे होते आणि त्यांचे अर्धे जेवण झाले होते. त्याच दरम्यान त्यांची पत्नी पल्लवी यांनी वाद घातला आणि अचानक त्यांच्यावर चाकूने वार केले. पल्लवी यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि दोरीने बांधून त्यांना भोसकून ठार मारले. त्यांच्यावर काचेच्या बाटलीने हल्ला करण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांना दोन चाकू आणि एक तुटलेली बाटली सापडली. महत्त्वाची बाब म्हणजे पल्लवी आणि मुलगी कृती दोघेही हत्येत सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. हल्ल्यानंतर, दोघांनी ओम प्रकाश यांचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला असेही पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी टेबलाजवळ जेवणाची प्लेट दिसत होती. तर डायनिंग हॉलमध्ये ओम प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. ओम प्रकाश यांची हत्या केल्यानंतर पल्लवी आणि कृती यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर पल्लवी यांनी पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कृतीने बाहेर येण्यास नकार दिला आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले. पल्लवी यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आणि हत्येची कबुली दिली. मात्र कृती आतच होती. शेवटी पोलिसांनी दरवाजा तोडून कृतीला ताब्यात घेतले आणि दोघांचे मोबाईल जप्त केले.
चौकशीदरम्यान, स्वतःच्या संरक्षणासाठी ओम प्रकाश यांची हत्या केल्याचे पल्लवी यांनी सांगितले. ओम प्रकाश हे घरात बंदूक घेऊन फिरत असे. किरकोळ वादाच्या वेळी ते बंदूक दाखवून गोळी मारण्याची धमकी देत असे, असे पल्लवी यांनी सांगितले. घटनेच्या वेळीही ओम प्रकाश यांनी बंदुकीने धमकावले त्यानंतर आपण त्यांच्यावर चाकूने वार केले, असे पल्लवी म्हणाल्या.
दरम्यान, ओम प्रकाश यांनी अनेक वेळा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माझ्या पत्नीकडून होणारा छळ मी सहन करू शकत नाही, असे सांगितल्याचे म्हटलं जात आहे. प्राथमिक तपासात ओम प्रकाश यांच्या छातीत, पोटात आणि हातावर चाकूने वार करण्यात आले होते. त्यांना सुमारे ८-१० वेळा चाकूने वार करण्यात आले. पोटाच्या भागात ४-५ जखमा होत्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. डायनिंग हॉलची फरशी रक्ताने माखलेली होती. ओम प्रकाश यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी सुमारे १५-२० मिनिटे स्वतःला वाचवण्याचा बराच प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आले आहे.