राजस्थानमधील पाली जिल्ह्यातून प्रामाणिकतेची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. येथील एका धान्य व्यापाऱ्याला गव्हाच्या पोत्यात तब्बल 15 लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने सापडले. मात्र कोणताही लोभ न ठेवता, त्या व्यापाऱ्याने ते दागिने सुरक्षितपणे मूळ मालक असलेल्या शेतकऱ्याला परत केले. या घटनेमुळे व्यापाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे संपूर्ण गावात कौतुक होत आहे.
गव्हाच्या पोत्यात सापडले मौल्यवान दागिने
ही घटना पाली जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या खैरवा गावातील आहे. येथील धान्य व्यापारी मांगू खान यांनी सुमारे 15 दिवसांपूर्वी गावातील शेतकरी घीसाराम घांची यांच्याकडून गव्हाची दोन पोती खरेदी केली होती. प्रत्येक पोत्याचे वजन सुमारे 50 किलो होते. मात्र त्या पोत्यांमध्ये मौल्यवान दागिने लपलेले आहेत, याची कल्पना त्यावेळी कुणालाही नव्हती.
टिफिनमध्ये ठेवून लपवले होते दागिने
शेतकऱ्याच्या पत्नीने घरातील सोन्या-चांदीचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी ते एका टिफिनमध्ये ठेवून गव्हाच्या पोत्यात लपवले होते. नंतर ही बाब कुटुंबाच्या लक्षात राहिली नाही आणि नकळत तेच गव्हाचे पोते व्यापाऱ्याला विकले गेले. काही दिवसांनी व्यापारी मांगू खान यांनी दुकानात पोते उघडून गहू काढताना त्यांना त्यामध्ये एक टिफिनबॉक्स सापडला. त्यात सोने आणि चांदीचे दागिने आढळले. या दागिन्यांची किंमत सुमारे 15 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
व्यापाऱ्याचा प्रामाणिकपणा ठरला चर्चेचा विषय
इतक्या मोठ्या किंमतीचे दागिने सापडूनही मांगू खान यांनी प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला. त्यांनी तात्काळ शेतकरी घीसाराम घांची यांना दुकानात बोलावून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आणि सर्व दागिने सुरक्षितपणे परत केले. आपले हरवलेले दागिने परत मिळाल्याने शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्यांनी व्यापाऱ्याचे आभार मानत त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. या घटनेनंतर खैरवा गावासह परिसरात मांगू खान यांच्या प्रामाणिकपणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Web Summary : Rajasthan trader found ₹15 lakh jewelry in wheat, returned it to the farmer. The wife hid the valuables in the grain. Honesty wins praise.
Web Summary : राजस्थान में व्यापारी को गेहूं में ₹15 लाख के गहने मिले, किसान को लौटाए। पत्नी ने कीमती सामान अनाज में छिपाया था। ईमानदारी की प्रशंसा हुई।