हरयाणा विधानसभा निवडणुकांतील त्रुटी आधीच का दाखवल्या नाहीत? निवडणूक आयोगाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:11 IST2025-11-06T14:09:51+5:302025-11-06T14:11:06+5:30
राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचे प्रत्युत्तर, पुरावे न्यायालयात सादर करण्याचे आदेश

हरयाणा विधानसभा निवडणुकांतील त्रुटी आधीच का दाखवल्या नाहीत? निवडणूक आयोगाचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणातील मतफेरफारबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. हरयाणातील मतदार याद्यांविरोधात एकही अपील दाखल झालेले नाही आणि अनेकवार मतदान झाल्याचे कोणतेही प्रकार आढळून आले नाहीत, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. २०२४ला हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत अनेकवार मतदान करणाऱ्यांबाबत काँग्रेसच्या बूथ एजंटनी आक्षेप का घेतला नाही, असा सवालही निवडणूक आयोगाने विचारला.
हरयाणामध्ये मतदार याद्यांमध्ये २५ लाख बनावट नोंदी आहेत. तसेच, या राज्यातील विधानसभा निवडणूक चोरण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी बुधवारी केला. त्याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राहुल गांधींनी हरयाणातील राय व होडल विधानसभा मतदारसंघांचा उल्लेख केला आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघांमधील निवडणुकांबद्दलचे आक्षेप व त्याविषयीचे सर्व पुरावे गांधी यांनी न्यायालयात सादर करावेत.
‘घर क्रमांक प्रलंबित आहे
‘घर क्रमांक शून्य’ मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, ज्यांना ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांनी अद्याप घर क्रमांक दिलेला नाही त्यांनाही ‘घर क्रमांक ०’ दिला जातो. जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांनी घर क्रमांक देणं प्रलंबित आहे, अशा ठिकाणी बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी ‘घर क्रमांक शून्य’ दिला आहे.
डुप्लिकेट नावे काढत का नाही?
निवडणूक आयोग मतदारयाद्यांतील डुप्लिकेट नावे काढून का टाकत नाही, असा सवाल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ते म्हणाले की, अशी नावे काढली तर निवडणुका निष्पक्ष पद्धतीने होतील. मात्र काही लोकांना निष्पक्ष निवडणुका नको आहेत, असा आरोपही त्यांनी केला. गेल्यावर्षी झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा विजय होणार असा बहुतांश एक्झिट पोलचा निष्कर्ष होता. पाच मोठ्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांत काँग्रेसच्याच विजयाची हमी देण्यात आली होती. विचित्र गोष्ट म्हणजे हरयाणामध्ये पहिल्यांदाच टपाल मतपत्रिकांचे निकाल प्रत्यक्ष निकालांपासून वेगळे होते.
खोटा व बिनबुडाचा आरोप : भाजप
हरयाणा विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आरोप ‘खोटा आणि बिनबुडाचा’ असल्याचा दावा भाजपने केला. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करत असून, ते देशातील लोकशाहीची बदनामी करीत असल्याची टीका भाजपने केली.
...हे काँग्रेसच्या मतदान एजंटांचे कर्तव्य
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसचे मतदान एजंट मतदान केंद्रांमध्ये काय करत होते? मतदाराने आधीच मतदान केले असेल किंवा त्याची ओळख संशयास्पद वाटत असेल, तर त्यावर आक्षेप घेणे हे काँग्रेसचे मतदान एजंटांचे कर्तव्य होते.