आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:16 IST2025-11-09T14:15:33+5:302025-11-09T14:16:13+5:30
Mohan Bhagwat on RSS: बेंगळूरु येथे आयोजित '१०० वर्षांचा संघ: नवीन क्षितीजे' या कार्यक्रमात भागवत बोलत होते.

आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
बेंगळूरु: आरएसएसवर बंदी घालण्यावरून सध्या कर्नाटकात मोठा वाद सुरु आहे. अशातच ही संघटना नोंदणीकृत संघटना नाही, असेही आरोप केले जात आहेत. यावर आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे.
बेंगळूरु येथे आयोजित '१०० वर्षांचा संघ: नवीन क्षितीजे' या कार्यक्रमात भागवत बोलत होते. "ज्याप्रमाणे हिंदू धर्म नोंदणीकृत नाही, त्याचप्रमाणे अनेक गोष्टींची नोंदणी केलेली नाहीय. संघावर यापूर्वी तीन वेळा बंदी घालण्यात आली होती. जर आम्ही तिथे नसतो, तर सरकारने कोणावर बंदी घातली असती? म्हणजेच सरकारने आम्हाला मान्यता दिली आहे.", असे भागवत म्हणाले.
आमचे राष्ट्र ब्रिटिशांनी निर्माण केलेले नाही. आपण शतकांपासून एक राष्ट्र आहोत. जगातील प्रत्येक राष्ट्राची एक मूळ संस्कृती असते आणि भारताची आत्मा हिंदू संस्कृती आहे. भारतात 'अहिंदू' कोणी नाही. प्रत्येक व्यक्ती, त्याने जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी भारतीय संस्कृतीचे पालन केले आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने हे समजून घेतले पाहिजे की 'हिंदू असणे म्हणजे भारताची जबाबदारी घेणे आहे, असे भागवत म्हणाले.
तसेच आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली होती. मग आम्ही ब्रिटिश सरकारकडे नोंदणी करायला हवी होती का? १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर सरकारने नोंदणी अनिवार्य केली नव्हती, असे भागवत यांनी स्पष्ट केले.