काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यांना ३ प्रश्न विचारले. "फक्त कॅमेऱ्यासमोरच पंतप्रधान मोदींचे रक्त उसळते", असाही टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.
पंतप्रधान मोदींसोबत इंदिरा गांधींचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पोकळ भाषणे देण्याचा आणि भारताच्या सन्मानाशी तडजोड केल्याचा आरोपही केला.
राहुल गांधींनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून मोदींचा व्हिडीओ शेअर करत त्यांना तीन प्रश्न विचारले आहेत. "मोदींनी दहशतवादाबाबत पाकिस्तानवर विश्वास का ठेवला?, डोनाल्ड ट्रम्पसमोर नतमस्तक होऊन भारताच्या हितांचा त्याग का केला? मोदींचे रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच का उसळते", अशा शब्दांत राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय, मोदींनी भारताच्या सन्मानाशी तडजोड केली, असेही राहुल गांधी म्हणाले.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूपच वाढला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताने आपल्या संरक्षण प्रणाली आकाशतीरने पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडला. मात्र, त्यानंतर देशाच्या राजकारणात ठिणगी पडली असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.