लोकसभेमध्ये कालपासून सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख करतानाच विरोधकांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांनाही उत्तरं दिली. तसेच ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताने पाकव्याप्त काश्मीर का घेतला नाही, या काँग्रेसच्या प्रश्नालाही उत्तर दिले.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यातून पाकव्याप्त काश्मीर मुक्त का केला नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आज पाकव्याप्त काश्मीर परत का नाही घेतलं, असे काही जण विचारत आहेत. मात्र हा प्रश्न विचारणाऱ्यांनी प्रथम पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानला कब्जा करण्याची संधी कुणाच्या सरकारे दिली, या प्रश्नाचं उत्तर द्यावं. याबाबत मी जेव्हा जेव्हा जवाहरलाल नेहरू यांचं नाव घेतो तेव्हा काँग्रेस आणि तिची संपूर्ण इकोसिस्टिम चवताळते, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर काही असे निर्णय घेतले गेले, ज्याची शिक्षा देश अजून भोगत आहे. अक्साई चीनसारखा भाग नापिक भूमी म्हणूवन सोडण्यात आला. त्यामुळे भारताला ३८ हजार किमी भूभाग गमवावा लागला.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी १९७१ साली बारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, त्यावेळी भारताने पाकिस्तानचे ९३ हजार सैनिकांना युद्धबंदी बनवण्यात आले होते. तसेच हजारो चौरस किमी क्षेत्रावर कब्जा करण्यात आला होता. मात्र तरीही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याबाबत काहीच पावलं उचलली गेली नाही. सारं काही अनुकूल असताना करतारपूर साहिबसुद्धा परत मिळवला नाही.