ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 21:43 IST2025-09-22T21:42:57+5:302025-09-22T21:43:27+5:30
मोरक्कोच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले राजनाथ सिंह रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी कासाब्लांका येथे पोहोचले होते. भारत आणि मोरक्को यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ आकारला आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट भाष्य केले आहे. या करासंदर्भात बोलताना "भारता मोठ्या विचारांचा आहे, म्हणूनच यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही," असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते मोरक्कोमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधत होते.
मोरक्कोच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले राजनाथ सिंह रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी कासाब्लांका येथे पोहोचले होते. भारत आणि मोरक्को यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
अमेरिकन टॅरिफ संदर्भात नेमकं काय म्हणाले राजनाथ सिंह?
टॅरिफ संदर्भात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, "आपण काहीही प्रतिक्रिया दिली नाही... जे लोक खुल्या विचारांचे आणि मोठ्या मनाचे असतात, ते कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत." त्यांचे हे विधान भारताचे धोरण शांततापूर्वक आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असल्याचे दर्शवते.
"लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश" -
यावेळी राजनाथ सिंह यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीचाही उल्लेख केला. भारताने डिजिटल क्षेत्रात केलेली क्रांती, ज्ञान-आधारित अर्थव्यवस्थेतील प्रगती आणि स्टार्टअप्समध्ये होणारी वाढ, यांसंदर्भात त्यांनी माहिती दिली. "जागतिक आव्हाने असूनही, भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. आपण ११ व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचलो आहोत आणि लवकरच जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.