'विवाहित असताना परपुरुषाशी संबंध ठेवल्याबद्दल आपल्या विरोधात खटला चालू शकतो', असे सर्वोच्च न्यायालयाने, पार्टनरवर बलात्काराचा आरोप केलेल्या एका महिलेला उद्देशून म्हटले आहे. संबंधित महिला, आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यास विरोध करत होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तिचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत जामीन योग्य ठरवला आहे.
जस्टिस एम एम सुंदरेश आणि जस्टिस एन. कोटिश्वर सिंह यांच्या पीठाने बुधवारी (16 जुलै, 2025) या प्रकरणावर सुनावणी करताना संबंधित महिलेला चांगलेच फटकारले. महिलेचे म्हणणे आहे की, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तिने तिच्या पतिला घटस्फोट दिल्यानंतर, त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
न्यायालयानं संबंधित महिलेला फटकारलं -याचिकाकर्त्याच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, "आपण एक विवाहित महिला आहात, आपल्याला दोन मुले आहेत. आपण एक मॅच्युअर महिला आहात आणि आपल्याला त्या नात्याची समज होती, जे आपण विवाहित असतानाही दुसऱ्या कुणाशी तरी ठेवत होतात." यावर महिलेच्या वकिलाने पुन्हा युक्तिवाद केला की, आरोपी याचिकाकर्त्याला वारंवार हॉटेलमध्ये बोलवत असे. यावर सर्वोच्च न्यायालय संबंधित महिलेला उद्देशून म्हणाले, 'आपण त्याच्या बोलावण्यावरून वारंवार जात का होतात? विवाहित असताना परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवणे, हा गुन्हा आहे, हे आपल्याला चांगले माहित होते.'
पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्यात उच्च न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. कारण, घटस्फोटानंतर आरोपीने महिलेशी शारीरिक संबंध ठेवले नसल्याचे उच्च न्यायालयाला आढळून आले. संबंधित महिलेची २०१६ मध्ये सोशल मीडियाद्वारे आरोपीशी ओळख झाली होती.