Akhilesh Yadav News:'ऑपरेशन सिंदूर' मुद्द्यावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. या विषयावर बोलताना खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या वेळेवरून शंका उपस्थित केला. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यासाठी ज्या गाडीतून आरडीएक्स आणले गेले, ती गाडी अजूनही का पकडली गेली नाही? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी भाजपवर राजकीय फायदा घेणारा पक्ष म्हणत निशाणा साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखिलेश यादव लोकसभेत बोलताना म्हणाले, "भारतीय लष्कराने शौर्याचा परिचय देत पराक्रम केला. त्याबद्दल मी लष्कराने अभिनंदन करतो. पण, आता मी ऐकत होतो की, दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवादी मारले गेले, त्याबाबतीत आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत आहोत. मात्र, प्रत्येक ठिकाणी राजकीय फायदा कोण घेत आहे? आज ऑपरेशन ऑपरेशनबद्दल मी सरकारचे अभिनंदन का करत नाहीये? जेव्हा राजकीय पाठिंबा देण्याची वेळ आली, तेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत होते."
ती गाडी आजपर्यंत का पकडण्यात आली नाही?
खासदार अखिलेश यादव पुढे बोलताना म्हणाले, "मग दहशतवादी चकमकीत कालच (२८ जुलै) का मारले गेले? आणि पुन्हा त्या विषयाचा मी उल्लेख करत आहे, ज्यामुळे पहलगाम झाले. ज्यामुळे पुलवामा झाले. जर यांना इतकंच तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींबद्दल माहिती आहे; तर मग पुलवामामध्ये गाडीतून आरडीएक्स आणले गेले, ती गाडी आजपर्यंत का पकडण्यात आली नाही?", असा सवाल अखिलेश यादव यांनी केला.
"भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कदाचित हे माहिती असेल की, सरकारचे अनेक विभाग असतात, जे सॅटेलाईट इमेजस् देतात. जर आजही भाजपची इच्छा असेल, तर पुलवामामध्ये जी गाडी आली होती, सॅटेलाईट इमेजच्या मदतीने तिच्याबद्दल माहिती मिळू शकते की, कोणत्या मार्गाने ती गाडी आली होती? मग ती गाडी शोधण्यासाठी तुम्ही हिंमत का करत नाहीये?", असा सवाल करत अखिलेश यादव यांनी सरकारला घेरले.
'सहा महिन्यात पीओके घेऊ म्हणाले होते'
"शिष्टमंडळात पाठवणाऱ्या व्यक्तींचा निर्णय सरकार घेऊ शकत नाही, राजकीय पक्ष ते ठरवतात. मग राजकारण कोण करत आहे? राजकारण करणारे हे लोक निवडणुकींच्या भाषणांमध्ये म्हणत होते की, आम्ही सहा महिन्यात पीओके घेऊ. अक्साई चीन घेऊ. आम्हाला युद्ध नकोय, पण सीमेवर शांती हवी. हे युद्ध पाकिस्तानसोबत नव्हते. तुम्ही कितीही लपा, लपवा. ही लढाई तुम्हाला चीनसोबत लढावी लागली", असे अखिलेश यादव म्हणाले.