देहराडून: भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी भारत-चीन संबंधांबाबत महत्त्वपूर्ण विधान करताना सीमा (Boundary) आणि सरहद (Frontier) यातील मूलभूत फरक स्पष्ट केला. शुक्रवारी (13 फेब्रुवारी 2026) देहरादून येथील भारत हिमालयी रणनीती मंच (India Himalayan Strategy Forum) या कार्यक्रमात बोलताना त्यांनी 1954 मधील 'पंचशील करार' का आवश्यक वाटला, यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमीही मांडली.
पंचशील करारामागील नेहरूंची भूमिका
जनरल चौहान म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश सत्तेचा अंत झाला आणि देशाच्या सीमांचे निश्चितीकरण करणे भारतासमोर मोठे आव्हान होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना कदाचित हे माहित होते की, पूर्वेकडे मॅकमोहन रेषेच्या स्वरूपात आपला काही दावा होता आणि लडाख भागातही काही प्रमाणात दावा होता. मात्र, काही क्षेत्रांबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळेच कदाचित ते पंचशील कराराकडे वळले.
चीनची भूमिकाही स्थिरतेचीच होती
CDS चौहान यांच्या मते, चीनची भूमिकाही याच दिशेने होती. ते म्हणाले, चीनने तिब्बतवर नियंत्रण मिळवल्यानंतर ल्हासा आणि शिनजियांगमध्ये प्रवेश केला. हे दोन्ही टोकांवरील क्षेत्र अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक होते. त्यामुळे त्या भागात स्थिरता आवश्यक होती. याच पार्श्वभूमीवर 1954 मध्ये भारताने तिब्बतला चीनचा भाग म्हणून मान्यता दिली आणि दोन्ही देशांमध्ये पंचशील करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
‘उत्तर सीमावाद सुटला’, असा भारताचा समज
जनरल चौहान यांनी सांगितले की, पंचशील करारानंतर भारताने असे गृहीत धरले की आपण उत्तर सीमेवरील वाद, जो औपचारिक कराराद्वारे सुटलेला नव्हता, तो सोडवला आहे. मात्र, पुढील काळात घडलेल्या घटनांनी हा समज चुकीचा ठरल्याचे इतिहासाने दाखवून दिले.
सीमा आणि सरहद यातील फरक काय?
आपल्या भाषणात CDS चौहान यांनी सीमा, सरहद आणि मध्य क्षेत्रांतील ऐतिहासिक जोडणी यावर विशेष भर दिला. ते म्हणाले, सीमा म्हणजे नकाशावर आणि जमिनीवर आखलेली स्पष्ट राजकीय व कायदेशीर रेषा आणि सरहद म्हणजे विस्तृत, खडतर आणि सभ्यतांमधील संपर्काचे क्षेत्र, जेथे परंपरा, रीतिरिवाज आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होते. त्यांच्या शब्दांत, सीमा दोन राष्ट्र-राज्यांना वेगळे करते, तर सरहद दोन सभ्यतांचा संगमबिंदू असते.
उत्तराखंड सीमावर्ती राज्य; पण आपण विसरतो
जनरल चौहान यांनी उत्तराखंडच्या सामरिक महत्त्वावरही भाष्य केले. ते म्हणाले, उत्तराखंड हे चीनच्या सीमेवर असलेले राज्य आहे. लडाख, सिक्किम किंवा अरुणाचल प्रदेशइतकी येथे तणावपूर्ण स्थिती नसल्याने आपण अनेकदा हे विसरतो. मात्र, भारत-चीनमधील सुरुवातीच्या सीमावादाची मुळे याच भागात होती. पंचशील कराराच्या आधी आणि लगेच नंतरच्या काळातील वादांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही सीमा इतर सीमांइतकीच महत्त्वाची आहे.
Web Summary : CDS Chauhan explained the historical context of the Panchsheel Agreement, highlighting Nehru's aim to stabilize borders post-independence. China's control over Tibet and the need for regional stability were key factors. India mistakenly believed border disputes were resolved, a notion proven wrong later.
Web Summary : सीडीएस चौहान ने पंचशील समझौते के ऐतिहासिक संदर्भ को समझाया, जिसमें नेहरू का उद्देश्य स्वतंत्रता के बाद सीमाओं को स्थिर करना था। तिब्बत पर चीन का नियंत्रण और क्षेत्रीय स्थिरता की आवश्यकता महत्वपूर्ण कारक थे। भारत ने गलती से माना कि सीमा विवाद हल हो गए हैं, जो बाद में गलत साबित हुआ।