कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान?; आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 06:55 IST2021-01-01T00:34:21+5:302021-01-01T06:55:13+5:30
जिंकूनच परत जाणार

कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान?; आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : ही लढाई आता केवळ शेतकऱ्यांची राहिलेली नाही. ही लढाई आता श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आहे, असे म्हणणे आहे मुरादाबादचे शेतकरी धर्म पाल यांचे. गत २८ दिवसांपासून ते गाझीपूर सीमेवर आंदोलन करत आहेत. नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात आले आहेत, असे सरकार सांगत आहे. मात्र, कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान होणार आहे हे सरकारने स्पष्ट करावे, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, आम्हाला फायदा नको आहे. मग सरकारकडून ही जबरदस्ती का केली जात आहे. गाझीपूर सीमेवर केवळ उत्तर प्रदेशातूनच नव्हे तर, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या राज्यातून शेतकरी आलेले आहेत. हे तीन कायदे मागे घेतल्याशिवाय येथून हटणार नाहीत, असे ते सांगत आहेत. उत्तर प्रदेशातील शेतकरी गुरुदयाल म्हणतात की, येथे भंडार भरलेले आहे. सरकार आम्हाला कधीपर्यंत बसून ठेवणार आहे.
फुटणार नाहीत, तुटणार नाहीत...
गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांसाठी तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहेत. या तंबूंची संख्या जवळपास ५०० आहे. प्रत्येक तंबूत २० ते २५ शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था आहे. महिलांसाठी चारही बाजूने बंद एक मोठा तंबू उभारण्यात आला आहे. यात ५०० महिलांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिन आहेत. जीवनाश्यक वस्तू मोफत दिल्या जात आहेत. येथे रक्तदान शिबिरेही होत आहेत. औषधांचे काउंटर आहे. ॲम्बुलन्स तयार आहेत. डॉक्टरही उपलब्ध आहेत. शीख समुदायाच्या महिला येथे येऊन भोजन बनविण्यात मदत करत आहेत. सर्वांचा एकच सूर आहे की, येथून जिंकूनच परत जाणार आहोत. अन्यथा, येथेच बसून राहणार आहोत. फुटणार नाहीत, तुटणार नाहीत.