पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (26 मे, 2025) गुजरातमधील दाहोद येथे अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, 'आज देश निराशेच्या गर्तेतून बाहेर पडत विश्वासाच्या प्रकाशात तिरंगा फडकवत आहे. तसेच, दहशतवाद्यांना इशारा देत ते म्हणाले, 'जो कुणी आमच्या माता भगिनींचे कुंकू (सिंदूर)पुसण्याचा प्रयत्न करेल, त्याचा खात्मा निश्चित आहे.'
काय म्हणाले...? -पंतप्रधान मोदी म्हणाले, "जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे काही केले, भारत गप्प बसू शकेल का? मोदी गप्प बसू शकेल का? विचार करा. जर कोणी आपल्या माता-भगिनींचे कुंकू (सिंदूर) पुसण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा खात्मा निश्चित आहे. म्हणूनच, ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही. तर ती आपल्या भारतीय मूल्यांची आणि आपल्या भावनांची अभिव्यक्ती आहे. दहशतवाद्यांनी १४० कोटी भारतीयांना आव्हान दिले होते. म्हणूनच मोदीने तेच केले, ज्यासाठी देशवासीयांनी त्याला प्रधानसेवकाची जबाबदारी दिली.'
'आपल्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली' -मोदी पुढे म्हणाले, "मोदीशी पंगा घेणे एवढे महागात पडू शकते, असा विचार कधी स्वप्नातही दहशत पसरवणाऱ्यांनी केला नसेल. त्यांनी २२ तारखेला जो खेळ खेळला होता, तो आम्ही हाणून पाडला. आमच्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पार धूळ चारली. आम्ही देशाच्या सैन्याच्या शौर्याला सॅल्यूट करतो."
काही लोकांना मला शिव्या देण्याची सवय - "देशाच्या प्रगतीसाठी जे काही आवश्यक आहे, ते आपण भारतातच बनवले पाहिजे, ही काळाची गरज आहे. आज आपण खेळण्यांपासून ते लष्करी शस्त्रांपर्यंत सर्व काही जगभरातील देशांमध्ये निर्यात करत आहोत. आज भारत रेल्वे, मेट्रो आणि त्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान बनवतो आणि जगाला निर्यातही करतो. नुकताच हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. काही लोकांना शिव्या देण्याची सवयच लागली आहे. ते म्हणायचे की निवडणुका आल्या, मोदीजींनी पायाभरणी केली, काहीही होणार नाही. आज, तीन वर्षांनंतर, या कारखान्यात पहिले इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह बनून तयार झाले आहे. आज त्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला," असेही मोदी म्हणाले.