धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:05 IST2025-07-22T12:04:51+5:302025-07-22T12:05:56+5:30
जगदीप धनखड यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप जवळपास २ वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा दिला आहे. आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे ते देशाचे सहावे उपराष्ट्रपती बनले आहेत. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर, 19 सप्टेंबरपूर्वी नव्या उपराष्ट्रपतींची निवड करणे आवश्यक आहे.

धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. मात्र यावरून, राजकीय वर्तुळात विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धडखड यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवला. महत्वाचे म्हणजे, जगदीप धनखड यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप जवळपास २ वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा दिला आहे. आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे ते देशाचे सहावे उपराष्ट्रपती बनले आहेत. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर, 19 सप्टेंबरपूर्वी नव्या उपराष्ट्रपतींची निवड करणे आवश्यक आहे.
धनखड यांच्यानंतर कोण सांभाळणार कामकाज? -
जेव्हा उपराष्ट्रपती पद रिक्त असते तेव्हा राज्यसभेच्या अध्यक्षांचे काम थांबत नाही. संविधानाच्या कलम ९१ नुसार, राज्यसभेच्या उपाध्यक्षांना तात्पुरत्या स्वरुपात अध्यक्षांचे काम पाहण्याचा अधिकार आहे. अर्थात कोणत्याही कारणास्तव उपराष्ट्रपती पद रिक्त झाले तर राज्यसभेचे उपाध्यक्ष अध्यक्षांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. संविधान त्यांना हा अधिकार देते.
19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणे का आवश्यक? -
उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा म्हणजे आता नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार. संविधानाचे कलम ६३ ते ७१ आणि उपराष्ट्रपती (निवडणूक) नियम १९७४ मध्ये उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सांगण्यात आली आहे. यानुसार, धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून ६० दिवसांच्या आत अर्थात १९ सप्टेंबर २०२५ पूर्वी ही निवडणूक होणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लवकरच होऊ शकते. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्य मिळून उपराष्ट्रपतीची निवड करतात.