भारताच्या इतिहासामध्ये १९४७ साली झालेली देशाची फाळणी हा काळा अध्याय मानला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद असता तरी तेव्हा देशवासियांना कधीही न भरून येणाऱ्या फाळणीचे घाव सोसावे लागले होते. याचदरम्यान, देशात फाळणीचे वारे वाहू लागल्यानंतर १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने डायरेक्ट अॅक्शन डेची घोषणा केली होती. त्यानंतर पुढचे चार दिवसा कोलकात्यामध्ये भीषण दंगल उसळली होती. त्यात सुमारे ८ ते १० हजार लोक मारले गेले होते. याच दंगलीदरम्यान, एक नाव समोर आले होते ते म्हणजे गोपाळ पाठा.
मुस्लिम लीगने केलेल्या डायरेक्ट अॅक्शन डेच्या आवाहनानंतर बंगालमध्ये १६ ऑगस्ट १९४६ रोजी दंगल भडकली होती. तसेच ही दंगल पुढे देशभरात पसरली होती. या दंगलींदरम्यान कलकत्त्यामध्ये मुस्लिम आणि हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. शहर कट्टरतावाद्यांच्या ताब्यात आलं. त्यांनी मोठ्या प्रमाणावहर हत्या आणि विध्वंसाची मालिका सुरू केली. त्याचवेळी बंगालचा तेव्हाचा मुख्यमंत्री हुसेन शाहीद सुहरावर्दी याने सशस्त्र मुस्लिमांविरोधात कुठलीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन दिलं. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली.
याच अराजकादरम्यान, गोपालचंद्र मुखर्जी हे नाव समोर आलं. त्यांना गोपाल पाठा या नावानेही ओळखलं जातं. कलकत्त्यामधील एका समुहाचे नेते असलेल्या गोपाल मुखर्जी यांनी हिंसक मुस्लिम जमावाला रोखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. गोपाल मुखर्जी यांच्या प्रयत्नांमुळे अनेक हिंदू मृत्यू आणि अपमानापासून वाचले, असा दावा केला जातो. त्यामुळे एक वर्ग त्यांच्याकडे महापुरुष म्हणून पाहतो. मात्र मोठ्या प्रमाणात हिंसाचार केल्याने त्यांना इतिहासात खलपुरुष म्हणूनही ओळखलं जातं.
दरम्यान, कोलकात्यामध्ये १६ ऑगस्ट १९४६ ते २० ऑगस्ट १९४६ दरम्यान, झालेल्या भीषण दंगलीनंतर कलकत्त्यासह बंगालचा मोठा भूभाग पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्याचा मुस्लिम लीगचा डाव यशस्वी होणार नाही हे स्पष्ट झालं होत. या भीषण संघर्षानंतर मुस्लिम लीगने हत्याकांड थांबवण्याचं आवाहन गोपाळ मुखर्जी यांना केलं. मात्र मुस्लिम लीगने आधी आपल्या कार्यकर्त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगावे अशी अट घातली. त्यामुळे कलकत्ता हे प्रमुख शहर पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्यामध्ये जे घटक कारणीभूत ठरले, त्यामध्ये गोपाल मुखर्जी यांनी दिलेलं आक्रमक प्रत्युत्तर हे ही एक असल्याचे सांगितले जाते. मात्र असं असलं तरी हिंसक कृत्यांमुळे त्यांचा इतिहासात व्हिलन अशाही उल्लेख केला जातो.