नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस, असा उघड-उघड संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकात धरणे आंदोलन सुरू केले. रविवारी संध्याकाळी (3 फेब्रुवारी) केंद्रीय अन्वेषण विभागानं कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापेमारी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरुन मोठा वादंग निर्माण झाला.
शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांच्या तपासात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी आयुक्तांच्या सरकारी निवासस्थानाबाहेरच रोखले आणि त्यांना शेजारच्या पोलीस ठाण्यात नेऊन अडकवून ठेवले. या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताने परिसरात तणाव वाढला.
या सर्व घडामोडींदरम्यान, खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरल्या. ममत बॅनर्जी सुरुवातीस राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आणि त्यानंतर कोलकाता शहराच्या मध्यवर्ती मेट्रो सारणी भागात त्यांनी रात्रीच धरणे आंदोलन सुरू केले. याठिकाणी राजीव कुमारदेखील आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पण, ममता बॅनर्जी ज्या पोलीस अधिकाऱ्यासाठी रात्रीपासून धरणे आंदोलनास बसल्या आहेत, ते आहेत तरी कोण हे जाणून घेऊया.
सीबीआयला नोंदवायचा आहे जबाबया घोटाळ्यांमधील महत्त्वपूर्ण फायली आणि दस्तावेज कथित स्वरुपात गहाळ झाल्याने सीबीआयनं राजीव कुमार आणि अन्य अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले होते. पण यातील एकही अधिकारी सीबीआयसमोर हजर झाला नाही.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कित्येक नेत्यांवरही आरोप आहे. या घोटाळ्यांमुळे तृणमूल काँग्रेस नेत्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे.
राजीव कुमार प्रामाणिक अधिकारी - ममता बॅनर्जीराजीव कुमार हे जगातील सर्वोत्तम प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. ते 24 तास आपले कर्तव्य पार पाडत असतात, असे ट्विट करत ममता बॅनर्जींना कुमार यांना आपला पाठिंबा दर्शवला. शिवाय, केंद्र सरकारची दादागिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही, असेही ट्विट ममता यांनी करत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला.