भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 05:33 IST2025-07-24T05:33:35+5:302025-07-24T05:33:55+5:30
संसदेतील पेच तिसऱ्या दिवशीही कायम; केंद्र सरकार ट्रम्प यांच्यासमोर नमते घेतेय का : विरोधक

भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडवून आणल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत २५ वेळा दावा केला आहे. त्यांनी मंगळवारी देखील पुन्हा तसाच दावा केल्याने त्या अनुषंगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले की, ट्रम्प पुन्हा पुन्हा तोच दावा करत आहेत म्हणजे ‘दाल मे कुछ काला है.’ भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प नेमके कोण आहेत.
ट्रम्प यांच्या दाव्यावर केंद्र सरकारने आजवर एकदाही वक्तव्य केलेले नाही. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली की, भारत पाकमध्ये शस्त्रसंधी घडवल्याचा ट्रम्प वारंवार दावा करत असून, केंद्र सरकार त्याला उत्तर का देत नाही? केंद्र सरकार ट्रम्प यांच्यासमोर नमते घेत आहे का?. या दोन देशांतील संघर्षातून अणुयुद्धही उद्भवण्याची शक्यता होती. ती मी थांबवल्याचे ट्रम्प म्हणाले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ
बिहारमधील मतदार यादी व अन्य काही मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ घातल्याने बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी पेच कायम होता. लोकसभेत फलक घेऊन येणाऱ्या खासदारावर कारवाई करावी लागेल, असा इशारा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. तरीही विरोधकांनी घोषणाबाजी केली, फलक फडकावले.
‘लोकशाही वाचवा, मतबंदी थांबवा’
बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी बुधवारी संसद परिसरात निदर्शने केली. पुनरीक्षण मागे घेण्याची व दोन्ही सभागृहांत चर्चा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना (उबाठा), झामुमो, राजद व डाव्या पक्षांसह विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते व खासदार मकर द्वाराबाहेर जमले व निदर्शने केली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सपाचे अखिलेश यादव, द्रमुकचे टीआर बालू, शिवसेना (उबाठा)चे संजय राऊत, तृणमूलचे कल्याण बॅनर्जी आदी नेत्यांनी ‘लोकशाही वाचवा, मतबंदी थांबवा’ अशा घोषणा दिल्या.
५२ लाखांहून अधिक मतदार झाले गायब
बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणात ५२ लाखांहून अधिक मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळले नाहीत. २६ लाख मतदार वेगवेगळ्या मतदारसंघात स्थलांतरित झाले आहेत, तर सात लाख मतदारांनी दोन ठिकाणी नोंदणी केल्याची माहिती पुढे आली.
एक लाख मतदारांचा ठावठिकाणा लागेना
बिहारमध्ये सुमारे एक लाख मतदारांचा ठावठिकाणाच लागत नाही, तर ७.१७ कोटी लोकांचे गणना अर्ज प्राप्त झाले असून, ते डिजिटल रूपात दाखल करण्यात आले आहेत. २० लाख मतदारांचा मृत्यू झाला तर २८ लाख अन्य मतदार त्यांच्या सध्याच्या पत्त्यावरून कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत.