नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मन की बात कार्यक्रमातून एक रॅपर हनुमानकाइंड याचं गाणं 'रन इट अप'चा उल्लेख केला. केरळमध्ये जन्मलेला रॅपर सूरज चेरूकटचं पंतप्रधानांनी विशेष कौतुक केले. सूरजला हनुमानकाइंड नावानेही ओळखलं जाते. सूरजने त्याचं नवं गाणं रन इट अप माध्यमातून भारतीय संस्कृतीला जगभरात पोहचवले आहे. भारतीय परंपरा आणि संस्कृतीला जगभरात प्रोत्साहन देण्याच्या सूरजच्या या प्रयत्नाचं कौतुक पंतप्रधान मोदींनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात म्हटलं की, आपल्या देशातील खेळ आता लोकांच्या पसंतीत येत आहेत. रॅपर हनुमानकाइंडचं नवीन गाणे रन इट अप सध्या खूप प्रसिद्ध झाले आहे. त्यात कलारी पयट्टू, गटका आणि थांग सारख्या आपल्या पारंपारिक मार्शल आर्टचा समावेश आहे. मी हनुमानकाइंडचं अभिनंदन करतो, त्यांच्या या प्रयत्नाने जगभरातील लोकांना आपले पारंपारिक मार्शल आर्टची माहिती मिळाली असं त्यांनी सांगितले.
हनुमानकाइंडचं हे नवीन गाणे रन इट अप सलग तिसऱ्या आठवड्यात अधिकृत एशियन म्युझिक चार्टमध्ये टॉपवर आहे. याआधीही बिग डॉग्स नावाने त्याचे गाणे हिट झाले होते. त्याने अलीकडेच स्पॉटीफायच्या टॉप ५० केंड्रिक लॅमरच्या नॉट लाइक असंलाही मागे सोडले होते. या गाण्याच्या व्हिडिओतून भारतातील विविध संस्कृती दाखवण्यात आली आहे. त्यात लोक परंपरा आणि पारंपारिक मार्शल आर्टचा समावेश करण्यात आला आहे.
हनुमानकाइंडचं रॅप साँग रन इट अप अल्पावधीतच भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झालं आहे. हनुमानकाइंड रॅपरचं खरे नाव सूरज चेरूकट असून त्याचा जन्म १७ ऑक्टोबर १९९२ मध्ये केरळच्या मलप्पुरम येथे झाला. भारतासह इटली, नायजेरिया, दुबई, सौदी अरबसारख्या अनेक देशात हनुमानकाइंडचे शो जबरदस्त प्रसिद्ध झालेत. वयाच्या १५ व्या वर्षीपासून सूरजने त्याच्या मित्रांसोबत रॅप करणे सुरू केले होते. हनुमानकाइंड नावाने त्याला लोकप्रियता मिळाली.
हनुमानकाइंड नाव कसं पडलं?
एका मुलाखतीत सूरजने हनुमानकाइंड नावामागची कहाणी सांगितली. मी हनुमान आणि इंग्रजी शब्द मॅनकाइंड म्हणजे माणुसकीशी हे जोडून हनुमानकाइंड नाव ठेवले होते. हनुमान असं नाव आहे जे भारतात तुम्हाला सगळीकडे ऐकायला मिळते. ७ मार्च २०२५ रोजी हनुमानकाइंडचं नवं गाणे रन इट अप रिलीज झाले. त्यातून भारतीय संस्कृतीची झलक दिसून येते.