भीषण! गाझाच्या अल-शिफा हॉस्पिटलचा वीजपुरवठा खंडित; WHO ने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 17:22 IST2023-11-12T12:56:50+5:302023-11-12T17:22:55+5:30
Israel Palestine Conflict : गेल्या 48 तासांत गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयावर अनेक वेळा हल्ले झाल्याची माहिती आहे.

भीषण! गाझाच्या अल-शिफा हॉस्पिटलचा वीजपुरवठा खंडित; WHO ने व्यक्त केली चिंता
इस्रायली सैनिकांनी गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाला वेढा घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) गाझामधील अल-शिफा रुग्णालयाशी संपर्क तुटला आहे. गेल्या 48 तासांत गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयावर अनेक वेळा हल्ले झाल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार, बॉम्बस्फोटामुळे आयसीयूचे नुकसान झाले आहे, तर विस्थापित लोक आश्रय घेत असलेल्या रुग्णालयाच्या भागांचेही नुकसान झाले आहे.
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस एडनोम घेब्रेयेसस यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून पळून गेलेल्यांपैकी काहींना गोळ्या घालून, जखमी किंवा ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे. पूर्व भूमध्य सागरी क्षेत्रासाठी WHO प्रादेशिक कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'WHO चा उत्तर गाझा येथील अल-शिफा हॉस्पिटलमधील संपर्क तुटला आहे."
"रुग्णालयावर वारंवार हल्ले होत असल्याच्या भयानक बातम्या येत असताना, आम्हाला विश्वास आहे की हजारो विस्थापित लोक आमच्या संपर्कात आले आहेत आणि ते क्षेत्र सोडून पळून जात आहेत." ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका निवेदनात टेड्रोस म्हणाले की, "डब्ल्यूएचओ आरोग्य कर्मचारी, शेकडो आजारी आणि जखमी रुग्ण, लाइफ सपोर्ट सिस्टीमवर असलेल्या लहान मुलांसह आणि हॉस्पिटलमध्ये राहणाऱ्या विस्थापित लोकांच्या सुरक्षेबद्दल गंभीरपणे चिंता वाटत आहे."
WHO ने पुन्हा गाझामध्ये तात्काळ युद्धविराम हवा असं म्हटलं आहे, जो जीव वाचवण्याचा आणि दुःखाची पातळी कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे. डब्ल्यूएचओ गंभीर जखमी आणि आजारी रूग्णांना सतत, व्यवस्थित, सुरक्षित वैद्यकीय स्थलांतर करण्याचं आवाहन करते. सर्व ओलिसांना योग्य वैद्यकीय सेवा मिळावी आणि त्यांना बिनशर्त सोडण्यात यावे असंही म्हटलं आहे.