- हरीश गुप्ता, नवी दिल्ली Vice President Election Cross Voting: उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षातील १५ खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा भाजपने केला आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी. सुद्रशन रेड्डी यांना फक्त ३०० मते मिळाली आहेत. त्यांना ३१५ मते मिळतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला होता. त्यांचे म्हणणे फोल ठरले हे आता सदर निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि पंजाब येथील खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय आहे. भाजपने यासाठी तयारी केली होती, असे बोलले जाते.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, विरोधकांच्या सर्व ३१५ खासदारांनी मतदान केले पण ते कुणासाठी केले हा खरा प्रश्न आहे.
इतकी घोषणाबाजी करूनदेखील इंडिया आघाडीच्या उमेदवाराला फक्त ३०० मते मिळाली. जयराम रमेश यांनी आणखी १५ मते मिळतील असा जो दावा केला होता तो मते कुठे गेली? विरोधकांनी एकजुटीचे केलेले दावे व वास्तव यातील फरक स्पष्ट झाला आहे. १५ खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले तसेच आणखी १५ खासदारांची मते अवैध ठरवली गेली म्हणजेच त्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे ती मते अमान्य ठरली. काँग्रेसचे खासदार शक्ती सिंह गोहिल यांनी स्पष्ट केलं की, विरोधी पक्षातील १५ मते दुर्दैवाने अवैध ठरली आणि आम्हाला फक्त ३०० मते मिळाली.
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली?
महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि पंजाब येथील खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय आहे. भाजपने यासाठी खास तयारी केली होती, असे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील काही खासदार अलीकडे एनडीएबाबत सकारात्मक बोलत होते. त्यामुळे त्यांच्या नावांची चर्चा येत्या काळात होईलच तसेच केरळ, पंजाब व इतर राज्यांतील काही नेते आपल्या पक्षाविरोधात उघडपणे बोलताना दिसले होते.
मतदान गुप्त स्वरूपाचं असतं, त्यामुळे कुणी क्रॉस व्होटिंग केलं किंवा चुकीचं मतदान केलं याचा थेट पुरावा मिळणं कठीण आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संख्याशक्तीपेक्षा राजकीय गणित, नाराजी आणि अंतर्गत गोंधळ यांचा मोठा प्रभाव दिसून आला.