जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:09 IST2025-09-01T19:09:09+5:302025-09-01T19:09:37+5:30
Jagdeep Dhankhar new Location: केंद्रातील सत्ताधाऱ्यांसोबत बिनसल्याने धनखड यांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप केला जात होता. आता उपराष्ट्रपती निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना धनखड कुठे आहेत, हे समोर आले आहे.

जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
जवळपास सव्वा महिन्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत याची माहिती आली आहे. अधिवेशन सुरु असताना अचानक राजीनाम्याची घोषणा करून धनखड गायब झाले होते. विरोधकांसह माध्यमे देखील धनखड कुठे आहेत, हे विचारत होते. केंद्रातील सत्ताधाऱ्यांसोबत बिनसल्याने धनखड यांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप केला जात होता. आता उपराष्ट्रपती निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना धनखड कुठे आहेत, हे समोर आले आहे.
धनखड हे ४० दिवसांनी दिल्लीतील धौला कुआ येथील आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी अधिकृत निवासस्थानातून बाहेर पडले. डेंटिस्टकडे ते गेले आहेत, असे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर आता ते सरकारी निवासस्थान नाही तर इंडियन नॅशनल लोक दल (INLD) प्रमुख अभय सिंह चौटाला यांच्या फार्म हाऊसवर रहायला जाणार आहेत.
दिल्लीतील छतरपूर एन्क्लेव्ह येथे चौटाला यांचे हे फार्म हाऊस आहे. विविध प्रसार माध्यमांनुसार धनखड यांचे साहित्य आधीच या फार्म हाऊसवर पोहोच करण्यात आले आहे. तर काही साहित्य त्यांच्या निवासस्थानातच ठेवण्यात आले आहे. २१ जुलै रोजी राजीनामा दिल्यानंतर ते अचानक गायब झाले होते. आता ते थेट राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवर रहायला जाणार असल्याने पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
या चर्चांवर चौटाला यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. आमचे जुने कौटुंबिक संबंध आहेत, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी माझ्याकडून घर मागितले नाही, मी त्यांना ते देऊ केले, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. धनखड यांनी माजी आमदार म्हणून पेन्शन पुन्हा सुरु करण्यासाठी गेल्याच आठवड्यात अर्ज केला आहे. ते पश्चिम बंगालचे राज्यपाल झाले तेव्हा त्यांना मिळणारी ही पेन्शन बंद झाली होती. ती पुन्हा सुरु करावी अशी मागणी त्यांनी राजस्थान सरकारकडे केली आहे. धनखड हे किशनगड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते.