दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 05:51 IST2025-05-02T05:51:00+5:302025-05-02T05:51:31+5:30
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएची एक विशेष टीम बुधवारी अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी पोहोचली असून, यात बैसरन खोऱ्याची थ्रीडी मॅपिंग सुरू करण्यात आली आहे.

दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
पहलगाम : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएची एक विशेष टीम बुधवारी अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी पोहोचली असून, यात बैसरन खोऱ्याची थ्रीडी मॅपिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि हल्ल्यानंतर कुठल्या मार्गाने पळ काढला, याचा शोध घेतला जात आहे.
थ्रीडी मॅपिंगसाठी आतापर्यंत नोंदवलेले साक्षीदारांचे जबाबही वापरण्यात येणार आहेत. यामुळे दहशतवाद्यांच्या हालचालींचा अचूक मागोवा घेणे शक्य होईल. या शोध मोहिमेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक सदानंद दाते यांनी घटनास्थळी भेट दिली.
सात तास सखोल तपास
एनआयएच्या टीमने बुधवारी सुमारे सात तास घटनास्थळी सखोल तपास केला. यात जम्मू-काश्मीर पोलिसांचे बॉम्ब निकामी पथक आणि न्यायवैद्यकीय तज्ज्ञही सहभागी झाले होते. यावेळी घटनास्थळावरून संशयास्पद नमुने घेण्याबरोबरच, साक्षीदारांचे जबाब आणि परिसरातील कामगार व घोडेवाले यांची चौकशी करण्यात आली. बैसरन खोऱ्याच्या आजूबाजूचा सुमारे तीन किलोमीटर परिसरात दहशतवाद्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गाचा तपास केला जात आहे.
१०० हून अधिक व्यक्तींचे एनआयएकडून जबाब
एनआयएच्या टीमने पहलगाम पोलिस ठाण्यात १०० हून अधिक व्यक्तींचे जबाब नोंदवले असून, यामध्ये झिपलाइन ऑपरेटर मुजम्मिलचाही समावेश आहे. या चौकशीतून लवकरच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सलग सातव्यांदा सीमेवर गोळीबार
पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढलेला असतानाच जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.
३० एप्रिल ते १ मेदरम्यान रात्रभर सुरुवातीला कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये गोळीबार सुरू झाला आणि त्यानंतर पूंछ, अखनूर, सुंदरबनी, नौशेरा (राजौरी) आणि अखेर जम्मू जिल्ह्यातील परगवाल या भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.
भारताने सिंधू जलकरार रद्द केल्याच्या रात्रीपासून म्हणजेच २४ एप्रिलपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे, अशी माहिती जम्मू येथील संरक्षण प्रवक्त्यांनी दिली.