लढाऊ विमानातून सोडला की विमानासारखाच शेकडो किमीवरून उडत उडत येतो बॉम्ब; DRDO ने बेटावर डागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:15 IST2025-04-11T18:14:53+5:302025-04-11T18:15:09+5:30
डीआरडीओने सुखोई लढाऊ विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्ब गौरवची अखेरची चाचणी पार पाडली. येत्या काही काळात हा बॉम्ब भारतीय हवाई दलाची ताकद वाढविणार आहे.

लढाऊ विमानातून सोडला की विमानासारखाच शेकडो किमीवरून उडत उडत येतो बॉम्ब; DRDO ने बेटावर डागला
डीआरडीओ या संरक्षण यंत्रणा बनविणाऱ्या भारतीय संस्थेने एक मोठे यश मिळविले आहे. एकाचवेळी एकाच बॉम्बने वेगवेगळी लक्ष्य भेदण्याची किमया याद्वारे करण्यात आली आहे. डीआरडीओने सुखोई लढाऊ विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्ब गौरवची अखेरची चाचणी पार पाडली. येत्या काही काळात हा बॉम्ब भारतीय हवाई दलाची ताकद वाढविणार आहे.
जवळपास १०० किमी अंतरावरून या वॉरहेडला डागण्यात आले. या बॉम्बने विमानातून खाली पडताच पुन्हा विमानासारखेच हवेतून पुढे जाण्यास सुरुवात केली. जवळपास १०० किमी अंतरावर असलेले एका बेटावरील लक्ष्य या बॉम्बने यशस्वीरित्या भेदले.
एलआरजीबी 'गौरव' हा १,००० किलोग्रॅम वजनाचा ग्लाइड बॉम्ब आहे. रिसर्च सेंटर इमरत, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आणि इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर यांनी डिझाईन केला आहे. याची खासियत अशी की, हा बॉम्ब खाली टाकला की तो त्याचे विमानासारखे पंख उघडतो, त्याच्या मागे असलेली मोटर त्याला पुढे घेऊन जाते आणि जीपीएस प्रणालीद्वारे तो लक्ष्यापर्यंत पोहोचतो. हे अंतर सुमारे १०० किमीपर्यंत आहे. याची क्षमता विमानावर लादल्या जाणाऱ्या मिसाईलपेक्षाही खूप जास्त आहे.
#WATCH | Defence Research and Development Organisation (DRDO) successfully conducted the Release Trials of Long Range Glide Bomb (LRGB) ‘Gaurav’ during 8-10 Apr 2025 from the SU-30 MKI. During the trials, weapon was integrated to multiple stations in different warhead… pic.twitter.com/nvYAdRTOB9
— ANI (@ANI) April 11, 2025
संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी 'गौरव'च्या यशस्वी विकास चाचण्यांसाठी डीआरडीओ, आयएएफ आणि इतर कंपन्यांचे कौतुक केले. एलआरजीबीच्या विकासामुळे सशस्त्र दलांच्या क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे ते म्हणाले. ही रिलीज चाचणी होती, यापूर्वीही या बॉ़म्बच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. परंतू, आता या यशस्वी चाचणीनंतर या ब़ॉम्बचे प्रत्यक्षात उत्पादन सुरु केले जाणार आहे.