"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:55 IST2025-08-04T13:53:57+5:302025-08-04T13:55:00+5:30
याआधीही हिंदी आणि मराठी भाषेवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होता

"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद सुरू आहेत. त्यातच मराठी भाषेवरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. मराठी भाषेच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यावेळी महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता असं वक्तव्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केले आहे.
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, मराठी भाषा आणि हिंदी भाषेला कधी राजभाषा म्हणून मान्यता मिळाली हे आपण पाहिले तर, ज्या संविधानात आज आपण राहतोय, त्यात हिंदी भाषेला आधी मान्यता दिली. देशाची राजभाषा म्हणून हिंदीला मंजुरी मिळाली. तेव्हा महाराष्ट्र प्रदेशच नव्हता. १९६० साली जेव्हा महाराष्ट्र बनला तेव्हा मराठीला महाराष्ट्राची राज्यभाषा घोषित केले गेले.
तर दहशतवादाला कोणताही रंग नसतो, तो दहशतवादच असतो. दहशतवादी येतात आणि घटना घडवून निघून जातात. तुम्ही दोषींना शोधू शकत नाही. मुंबईत ७ बॉम्बस्फोट झाले, पण तुम्ही आरोपींना शोधू शकले नाहीत. मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला, तुम्हाला आरोपी शोधता आले नाही असं म्हणत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी तपास यंत्रणा आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
दरम्यान, भगवा दहशतवादी असला म्हणून त्याची पूजा करणार का? दहशतवाद हा दहशतवादीच असतो. रंग माणसांच्या जीवनात असतो, जेव्हा माणूस मरतो तेव्हा रंग निघून जातो. मेलेल्या माणसांचे फोटोही कलर ठेवत नाहीत, ते ब्लॅक अँन्ड व्हाईट केले जातात. फ्लॅशब्लॅक दाखवतानाही काळ्या रंगाचा दाखवतात. त्यामुळे दहशतवादाला रंग नसतो. दहशतवादामध्ये रंग शोधत असतात, ते दहशतवादाबद्दल पक्षपाती आहेत असा आरोपही अविमुक्तेश्वरानंद यांनी केला.
ठाकरे कुटुंबावरही साधला होता निशाणा
याआधीही हिंदी आणि मराठी भाषेवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होता. आज जे लोक मराठीचा आग्रह धरत आहेत, त्यांचा इतिहास सर्वांसमोर आहे. त्यांच्याच पूर्वजांनी आपले चरित्र लिहिले आहे, आपल्या कुटुंबाचा इतिहास लिहिला आहे. ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरून आले होते. ठाकरे मगधमधून आले होते. तेव्हा तेही मराठी नव्हते. त्यांनाही मराठी येत नव्हती. तेव्हा महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले. मगध येथून आलेल्या कुटुंबाचा स्वीकार केला. त्यांना मोठे मराठी भाषिक केले आणि तेच आता मराठीसाठी लढा देत आहेत. मगध येथील मागधी भाषा विसरले आणि मराठी स्मरणात राहिली. महाराष्ट्रातील लोकांनी आपल्या पूर्वजांना प्रेम दिले. ते आपण पुढे का नेत नाहीत. लोकांना एवढे प्रेम द्या की ते त्यांची भाषा विसरून मराठी स्वीकारतील. हा मार्ग तुम्ही का स्वीकारत नाही असा प्रश्न शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला होता.