'बंकिम दा' नव्हे, 'बंकिम बाबू'; PM मोदींना तृणमूल खासदाराने का थांबवले? या शब्दांमधील नेमका फरक काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 00:01 IST2025-12-08T23:56:54+5:302025-12-09T00:01:31+5:30
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी पंतप्रधान मोदींना मध्येच थांबवले होते.

'बंकिम दा' नव्हे, 'बंकिम बाबू'; PM मोदींना तृणमूल खासदाराने का थांबवले? या शब्दांमधील नेमका फरक काय?
PM Modi Corrected in Parliament: राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज लोकसभेत चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात एक मजेदार प्रसंग घडला. पंतप्रधान बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांचा उल्लेख वारंवार 'बंकिम दा' असा करत होते. बंगाली संस्कृतीनुसार हे संबोधन चुकीचा असल्याने, तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी त्यांना मध्येच टोकले. यानंतर स्वतःची चूक सुधारत पंतप्रधान मोदींनी सौगत रॉय यांची फिरकी घेतली आणि सभागृहात एकच हशा पिकला.
'बंकिम दा' आणि 'बंकिम बाबू'चा गोंधळ
'वंदे मातरम्' या गीताचे लेखक बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या योगदानावर पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी उत्साहाने चार वेळा 'बंकिम दा' असा उल्लेख केला. "१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामावेळी इंग्रज आपला राष्ट्रीय गीत 'गॉड सेव द क्वीन' भारतात पोहोचवण्याचा कट करत होते. अशा वेळी बंकिम दा यांनी ईंट का जवाब पत्थर से दिला आणि त्यातून 'वंदे मातरम्'चा जन्म झाला."
असा उल्लेख वारंवार झाल्यावर, तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांना शांत बसवले नाही. त्यांनी पंतप्रधान मोदींना मध्येच टोकले. "तुम्ही बंकिम दा बोलत आहात. त्यांना 'बंकिम बाबू-बंकिम बाबू' म्हणतात," असं सौगत रॉय म्हणाले.
दादा म्हणायला हरकत नाही ना?
सौगत रॉय यांनी टोकताच पंतप्रधानांना आपली चूक लगेच लक्षात आली. त्यांनी तातडीने स्वतःला सुधारून घेतले आणि सौगत रॉय यांचे आभार मानले. "बंकिम बाबू. थँक्यू-थँक्यू. तुमच्या भावनांचा मी आदर करतो. बंकिम बाबू यांनी. थँक्यू दादा (सौगत रॉय). तुम्हाला तर दादा म्हणू शकतो ना? नाहीतर त्यातही तुम्हाला आक्षेप असेल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी सौगत रॉय यांची दादा म्हणत घेतलेली ही फिरकी पाकून संपूर्ण सभागृहात जोरदार हशा पिकला आणि वातावरण हलके झाले.
'बाबू' आणि 'दा' मध्ये फरक काय?
बंगालमध्ये 'दा' (दादा) आणि 'बाबू' हे दोन्ही शब्द आदर व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. पण, जाणकारांच्या मते, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांसारखी व्यक्तिमत्त्वे मोठी बंधू नसून पितृतुल्य मानली जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी 'बंकिम दा' ऐवजी 'बंकिम बाबू' किंवा केवळ 'बंकिमचंद्र' असा उल्लेख करणे अधिक योग्य ठरते. हिंदीमध्ये ज्याप्रमाणे गांधीजींना 'गांधी भाई' किंवा प्रेमचंद यांना 'प्रेमचंद भाई' म्हणत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे हा भावनिक फरक आहे.