काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:26 IST2025-11-06T10:23:31+5:302025-11-06T10:26:08+5:30
Mamata Banerjee: SIR प्रक्रियेला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी BLO ने नियमानुसार एन्युमरेशन फॉर्म दिला. या घटनेमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात आणि मतदार नोंदणी प्रक्रियेत नवी चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
कोलकाता: निवडणूक आयोगाच्या मतदार पुर्नपडताळणीला विरोध करायला सांगण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी रॅली काढली होती. परंतू, याच ममता बॅनर्जी यांनी या रॅलीच्या दुसऱ्याच दिवशी आलेल्या बीएलओकडून हा फॉर्म स्वीकारला आहे. लोकांना विरोध करायला लावून ममता या मात्र सेफ गेम खेळताना दिसत आहेत. आता हा फॉर्म भरून झाला की बीएलओ तो घेऊन जाणार आहे.
विरोधकांनी एकीकडे मतदार यादीवरून मतचोरीचे आरोप सुरु केले आहेत, दुसरीकडे निवडणूक आयोग करत असलेल्या मतदार पुर्नपडताळणीला विरोध करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळेच ममता या सीर प्रक्रियेचे राजकारण करत आहेत. परंतू, स्वत: मात्र या प्रक्रियेचा फॉर्म स्वीकारला आहे.
नेमके काय घडले...
ममता बॅनर्जी यांनी SIR प्रक्रियेविरोधात कोलकातामध्ये भव्य मोर्चा काढत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर संगनमताने मतदारांच्या नावांमध्ये गडबड करत असल्याचा आरोप केला होता. या राजकीय रणधुमाळीदरम्यान, बुधवारी त्यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी एक BLO एन्युमरेशन फॉर्म घेऊन हजर झाले. बीएलओ जेव्हा मुख्यमंत्रींच्या निवासस्थानाच्या कार्यालयात फॉर्म देण्यासाठी पोहोचले, तेव्हा सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांनी फॉर्म त्यांच्याकडेच देण्यास सांगितले. मात्र, बीएलओने नियमांचा हवाला देत स्पष्टपणे नकार दिला. फॉर्म केवळ संबंधित मतदारालाच सुपूर्द केला जाईल, अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली.
अखेर सुरक्षा रक्षकांना बीएलओची तपासणी करून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी द्यावी लागली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी स्वतः हा फॉर्म स्वीकारला आणि बीएलओला तो भरल्यानंतर कळवले जाईल, असे सांगितले. ममता यांच्या या दुटप्पी वागण्याचा आता त्यांच्या मतदारांवर परिणाम होणार आहे.