आज लोकसभेत वक्फ दुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) सादर होणार आहे. यासंदर्भात संपूर्ण देशभरातच चर्चा सुरू आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही पक्षाची भूमिका मांडली आहे. "वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. हे विधेयक एक सामान्य विधेयक आहे. याचा कुणी मेळ घालत असेल, तर तो मूर्खपणा आहे. या विधेयकाचा जर संबंध असेलच तर, वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यात कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपे जावे, त्यासाठी या विधेयकाचे स्पष्ट प्रयोजन दिसत आहे. आमची भूमिका ठरलेली आहे. तुम्हाला ती शेवटच्या क्षणी दिसेल. आम्ही संदिग्ध अजिबात नाही. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यानंतर करायच्या असतात आणि आम्ही त्या करू, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, "भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही या देशात हिंदुत्वाच्या मिशीला पीळ देत फिरत आहोत. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. हे विधेयक एक सामान्य विधेयक आहे. या विधेयकात काही सुधारणा करण्याची सरकारची इच्छा आहे. त्या सुधारणांना या देशात केवळ मुस्लिमांचाच विरोध आहे, असे नाही. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही या विधेयकाला तसा पूर्ण पाठींबा नाही. भाजपने राज्यात औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेला, 'याची गरज नाही, उगाच वातावरण खराब करू नका,' असे म्हणत संघाने विरोध केला. या बिलासंदर्भातही संघाची भूमिका त्याच पद्धतीची आहे, अशी माझी माहिती आहे. यामुळे, हिंदुत्वाचा विषय आणि या बिलाचा विषय, याचा कुणी मेळ घालत असेल, तर तो मूर्खपणा आहे."
राऊत पुढे म्हणाले, "या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे, हे फडणवीस सांगू शकतील का? इतर सुधारणावादी जी विधेयके असता, तसेच हेही एक विधेयक आहे. या विधेयकाचा जर संबंध असेलच तर, वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यात कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपे जावे, त्यासाठी या विधेयकाचे स्पष्ट प्रयोजन दिसत आहे. शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे वक्फ बोर्डाच्या निमित्ताने जी बांग देत आहेत, हा मूर्खपणा आहे. हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिलं त्या ठिकाणी आहेत.
"आम्ही स्वतः विरोधी पक्षात असताना, भारतीय जनता पक्षाने आणलेल्या कलम ३७० च्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे ना. कारण तो विषय, राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रिय एकात्मता आणि हिंदुत्वाच्या संदर्भात होता. आम्ही तिहेरी तलाकच्या विधेयकालाही विरोध केला नाही. कारण तो विषय गरीब मुस्लीम महिलांच्या संदर्भात होता. मात्र, वक्फ बोर्ड विधेयकाचा जो विषय आहे, तो त्यांच्या लाखो कोटी रुपयांच्या पॉपर्टी संदर्भातील विषय आहे. भविष्यात त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का? त्यासाठी झालेली ही पायाभरणी असल्याचे आम्हाला स्पष्ट दिसते," असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व खासदारांनी रात्री येथेच बसून चर्चा केली. आता पुन्हा आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात बसणार आहोत. आमची भूमिका ठरलेली आहे. तुम्हाला ती शेवटच्या क्षणी दिसेल. असे राऊत यांनी सांगितले. यावेळी, विरोध की पाठींबा अजूनही संदिग्धता आहे? असे विचारले असता, राऊत म्हणाले, संदिग्ध अजिबात नाही. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यानंतर करायच्या असतात आणि आम्ही त्या करू.