शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर फडकवलेल्या झेंड्याचा नेमका अर्थ काय?; जाणून घ्या!

By मुकेश चव्हाण | Published: January 26, 2021 05:21 PM2021-01-26T17:21:33+5:302021-01-26T17:22:05+5:30

दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंदोलकांनी शेतकरी आंदोलनाच्या झेंड्यासोबतच एक केशरी रंगाचा झेंडा लावला आहे.

What exactly is the meaning of the flag hoisted by the farmers on the Red Fort during the agitation ?; Find out! | शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर फडकवलेल्या झेंड्याचा नेमका अर्थ काय?; जाणून घ्या!

शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर फडकवलेल्या झेंड्याचा नेमका अर्थ काय?; जाणून घ्या!

googlenewsNext

नवी दिल्ली:  गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली आहे. मात्र आंदोलक शेतकरी आणि पोलीस काही ठिकाणी आमने-सामने आले असून हे शेतकरी आंदोलन चिघळल्याचे दिसून येत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करत लाल किल्ल्यावर कब्जा केला आहे. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला झेंडा फडकवला आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंदोलकांनी शेतकरी आंदोलनाच्या झेंड्यासोबतच एक केशरी रंगाचा झेंडा लावला आहे. त्या झेंड्यावर एक चिन्ह आहे. हा झेंडा पाहिल्यावर सोशल मीडियावर हा नेमका कोणता झेंडा आहे, या झेंड्याचा नेमका अर्थ काय आहे, याची चर्चा रंगू लागली आहे. 

'बीबीसी मराठी'ने दिलेल्या वृत्तानूसार बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी खुशाल लाली सांगतात की, या झेंड्याला 'निशाण साहेब' म्हणतात. यावर एक चिन्ह आहे. या चिन्हाला 'खंडा' असे म्हणतात. शीखांचे गुरू हरगोविंद सिंगांनी 'संत सिपाही'ची संकल्पना मांडली होती. हीच संकल्पना शीखांचे दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांनी पुढे नेली. त्यानुसार 'खंडा'चे चिन्ह तयार करण्यात आलेले आहे.

शिखांचे दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांनी खालसा या पंथाची स्थापना केली होती. त्यांनीच खालसा पंथाचे स्वरूप कसे असावे, चिन्ह कोणते असावे याबाबत सूचना दिलेल्या आहेत. हर गोविंदसिंग यांच्या काळात सुरुवातीला खंडाच्या चिन्ह्यात फक्त दोन कृपाण होत्या पण गुरू गोविंद सिंग यांनी त्यात चक्र आणि दुधारी तलवार यांचा समावेश केला, अशी माहिती खुशाल लाली यांनी दिली. तसेच हे खंडा चिन्ह एक दुधारी तलवार, एक चक्र आणि दोन कृपाण मिळून तयार करण्यात आलेले आहे. केसरी रंगाच्या ध्वजावर हे चिन्ह झळकताना दिसते. केसरी रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. प्रत्येक गुरुद्वाऱ्याबाहेर हा ध्वज लावला जातो. दुरून येणाऱ्या व्यक्तीला हे कळावे की गुरुद्वारा कुठे आहे ही त्यामागची भावना आहे, असं खुशाल लाली यांनी सांगितले. 
 
दरम्यान, गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. आज शेतकऱ्यांकडून दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहण्यास मिळाले आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र असून तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचं दृश्य पहायला मिळत आहे. 

इंटरनेट सेवा बंद-

आंदोलन हिंसक वळण घेत असल्याने दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर येणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र हे हिंसक आंदोलन अजून पेटू नये म्हणून अफवांना आळा बसावा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून संबंधित भागातील इंटरनेट सेवा आणि टेलिकॉम सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहील. 

Web Title: What exactly is the meaning of the flag hoisted by the farmers on the Red Fort during the agitation ?; Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.