पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशात सुमारे ६०,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यानंतर, अमरावती येथील एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी असे काही बोलले की, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आपले हसू रोखू शकले नाहीत. मोदी म्हणाले, "आत्ताच चंद्राबाबू तंत्रज्ञानासंदर्भात माझे कौतुक करत होते. मात्र, आज मी तुम्हाला एक गुपित सांगतो. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री झालो होतो, तेव्हा हैदराबादमध्ये बाबू कशा प्रकारे उपक्रम राबवत होते, याचा अभ्यास करायचो आणि त्यातून खूप काही शिकायला मिळायचे. आज मला ते अंमलात आणण्याची संधी मिळाली आहे. मी ते अंमलात आणत आहे." मोदी हे बोलत असताना, नायडूच्या चेहऱ्यावर स्मीत दिसत होते, नंतर त्याचे हास्यात रुपांतर झाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी माझ्या अनुभवावरून सांगतो की, तंत्रज्ञान असो अथवा मोठ्या प्रमाणावर काम करायचे असो, ते लवकरात लवकर अंमलात आणायचे असेल, तर चंद्राबाबू नायडू ते काम सर्वोत्तम पद्धतीने करू शकतात."
मोदी म्हणाले, 'आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, इंद्रलोक राजधानीचे नाव अमरावती होते. मात्र आता अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे. हा केवळ योगायोग नाही तर सुवर्ण आंध्रच्या निर्मितीसाठी एक शुभ संकेत आहे. सुवर्णिम आंध्र विकसित भारताचा मार्ग मजबूत करेल. अमरावती सुवर्णिम आंध्रच्या व्हिजनला ऊर्जा देईल.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "आज मी अमरावतीच्या या पावन भूमीवर उभा असताना, मला केवळ एक शहर दिसत नाही, तर एक स्वप्न साकार होताना दिसत आहे. अमरावती ही एक अशी भूमी आहे, जिथे परंपरा आणि प्रगती सोबत चालतात. आज येथे सुमारे ६०,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे. हा प्रकल्प आंध्र प्रदेशच्या आकांक्षांचा आणि विकसित भारताच्या आशेचा एक मजबूत पाया आहे."