फरार प्रदीप सूर्यवंशीच्या अटकेसाठी काय केले?

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30

लखनभैया हत्याकांड : प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

What did the arrest of absconded Pradeep Suryavanshi? | फरार प्रदीप सूर्यवंशीच्या अटकेसाठी काय केले?

फरार प्रदीप सूर्यवंशीच्या अटकेसाठी काय केले?

नभैया हत्याकांड : प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

मुंबई : बहुचर्चित लखनभैया हत्याकांडप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले प्रमुख आरोपी तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी गेले वर्षभर फरार आहेत. त्यांना पुन्हा अटक करण्यासाठी पोलिसांनी काय केले, असा सवाल मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला विचारला.
सूर्यवंशी यांच्या अटकेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेशही न्या. पी. व्ही. हरदास व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने दिले. जन्मठेपेनंतर तळोजा कारागृहात रवानगी झालेले सुर्यवंशी नोव्हेंबर २०१३ मध्ये फर्लोवर (संचित रजा) बाहेर आले. वैद्यकीय कारण पुढे करून त्यांनी ही रजा आणखी तीन महिने वाढवून घेतली. रजेची मुदत संपल्याने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांना पुन्हा तळोजा कारागृहात परतणे आवश्यक होते. मात्र ते कारागृहात न परतता फरार झाले. त्यानंतर तळोजा कारागृहाच्या जेलरच्या तक्रारीवरून मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी एप्रिल २०१४ मध्ये सूर्यवंशींविरोधात गुन्हाही दाखल केला होता. गुन्हा नोंदवून वर्ष लोटले तरी एमएचबी पोलीस सूर्यवंशी यांचा शोध घेऊ शकले नाहीत.
लखनभैया प्रकरणात चकमकफेम प्रदीप शर्मा मुख्य आरोपी होते. शर्मा, सूर्यवंशींसह एकूण २२ जणांना तत्कालीन उपायुक्त के. एम. एम. प्रसन्ना यांच्या विशेष तपास पथकाने अटक केली होती. त्यात १४ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश होता. एप्रिल २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली; तर उर्वरित २१ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यानंतर लखनभैयाचे बंधू ॲड. रामप्रसाद गुप्ता यांनी दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींची शिक्षा आणखी वाढवावी, अशी मागणी करणारी फेरविचार याचिका उच्च न्यायालयात केली. तर शर्मा यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातही अपील केले. राज्य सरकारनेही तसे अपील उच्च न्यायालयात केले आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. सूर्यवंशी तसेच शैलेंद्र पाण्डे उर्फ पिंकी हा आरोपीही फरार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: What did the arrest of absconded Pradeep Suryavanshi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.