गंगास्नानाने लाभ काय?
By Admin | Updated: March 20, 2015 01:31 IST2015-03-20T01:31:08+5:302015-03-20T01:31:08+5:30
‘नमामि गंगे ’ म्हणत गंगा नदीसाठी खास मंत्रालय देणारे मोदी सरकार लोकसभेत अचंबित झाले ते त्यांच्याच पक्षाच्या प्रभातसिंग प्रतापसिंग चौहान या खासदाराने विचारलेल्या कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नाने.

गंगास्नानाने लाभ काय?
नवी दिल्ली : ‘नमामि गंगे ’ म्हणत गंगा नदीसाठी खास मंत्रालय देणारे मोदी सरकार लोकसभेत अचंबित झाले ते त्यांच्याच पक्षाच्या प्रभातसिंग प्रतापसिंग चौहान या खासदाराने विचारलेल्या कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नाने.
गंगा नदी आली कुठून? या पवित्र नदीत स्नान केल्याने कोणता लाभ होतो? असा प्रश्न चौहान यांनी केल्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनाही हा काय प्रश्न झाला? असे विचारल्यावाचून राहवले नाही. सरकारनेही राजा भगीरथाने गंगा आणली असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
जल संसाधन आणि नदी विकास राज्यमंत्री सावरलाल जाट एका पूरक प्रश्नाला उत्तर देत असताना चौहान यांनी हा प्रश्न विचारत धमाल उडवून दिली. गंगा नदीला कुणी आणले? का आणले? या नदीत स्नान केल्याने कोणते फायदे होतात? हे जाणून घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर एकच हंशा पिकला. अनेकांना आश्चर्य व्यक्त करण्यावाचून राहवले नाही. जाट उत्तरात म्हणाले की, ही बाब ऐतिहासिक आहे. लोकांच्या कल्याणासाठी राजा भगीरथाने गंगा नदीला आणले. या नदीची पूजा केली जाते. (भगीरथाने तपश्चर्या करीत भगवान शिवाला वर मागून ही नदी स्वर्गातून पृथ्वीवर पाठवायला लावले, असा पौराणिक दाखला देण्याचा जाट यांचा उद्देश होता).
आणि वटवृक्षही...
भाजपचे अन्य सदस्य रतनलाल कटारिया हेही अशाच एका प्रश्नाने चर्चेत आले. त्यांनी लक्षवेधी सादर करीत कुरुक्षेत्रावरील वटवृक्षाला स्मारक घोषित करण्याची मागणी केली. सरकारने त्यावर दिलेल्या उत्तरावर त्यांनी संतापही व्यक्त केला. हरियाणातील कुरुक्षेत्रावर ज्या वटवृक्षाखाली भगवान कृष्णांनी गीता उपदेश केला ते स्थळ स्मारक घोषित का होऊ शकत नाही? भाजप सरकार तर प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सरकारचे उत्तर समाधानकारक नाही. पाच हजार वर्षांपूर्वी कृष्णांनी वटवृक्षाखाली गीता उपदेश दिला होता. जगद्गुरू शंकराचार्यही त्या ठिकाणी जाऊन आले होते. मंत्री म्हणतात ते स्मारक नाही. केवळ विटा ठेवल्याने स्मारक बनते काय? हजारो भाविक तेथे जातात. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणीही तेथे जाऊन आले होते. त्यावर सांस्कृतिक अािण पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी प्राचीन स्मारक, तसेच पुरातत्वीय अवशेष कायदा १९५८ चा दाखला दिला. कोणतीही वास्तू, स्तूप, दफन भूमी, गुहा तसेच कलात्मक रचनाच त्यात मोडतात, असे सांगितले. मात्र कटारिया यांचा रोष कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्प. बंगालमधील एका ननवरील बलात्काराच्या घटनेनंतर एका साध्वीबाबतही असभ्य प्रकार घडल्याची निंदा लोकसभेत केली जात असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य हमरीतुमरीवर उतरले. वारंवार आवाहन करूनही सदस्य शांत होत नाही हे बघून लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन उद्विग्नपणे म्हणाल्या की, दोन्ही पक्षाच्या सदस्यांना लाठी आणून देऊ काय? हे काय चालले आहे? लढायचे असेल तर बाहेर जा.
च्सभागृहाचा वेळ वाया जात आहे. आता तर मर्यादा ओलांडली जात आहे. हे सभागृह त्यासाठी बनलेले नाही. महिलांसंबंधी गैरवर्तनाबाबत राजकारण केले जाऊ नये.