रामनवमी हिंसाचाराची चौकशी NIA द्वारे व्हावी, भाजपा नेत्याचे राज्यपालांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 12:58 PM2024-04-18T12:58:00+5:302024-04-18T12:58:22+5:30

West Bengal Ram Navami clashes : मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीबाबत भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहिले आहे.

West Bengal Ram Navami clashes: Suvendu Adhikari demands NIA probe, EC action against Mamata  | रामनवमी हिंसाचाराची चौकशी NIA द्वारे व्हावी, भाजपा नेत्याचे राज्यपालांना पत्र

रामनवमी हिंसाचाराची चौकशी NIA द्वारे व्हावी, भाजपा नेत्याचे राज्यपालांना पत्र

West Bengal Ram Navami clashes:  पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बुधवारी रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाली. या घटनेवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीबाबत भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहिले आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीची चौकशी 'राष्ट्रीय तपास यंत्रणे' (NIA) द्वारे करण्यात यावी, असे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच या मुद्द्यावरून सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील टीएमसी सरकारलाही धारेवर धरले आहे.

सुवेंदू अधिकारी यांनी पत्रात लिहिले आहे की, "मला तुम्हाला (राज्यपालांना) पश्चिम बंगालमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जाणीव करून द्यायची आहे. बंगालमध्ये सण साजरे करणाऱ्या हिंदूंवर हल्ले करून जातीय तेढ निर्माण करण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. राज्यात धार्मिक सण साजरे करणाऱ्या हिंदूंवर दगडफेक आणि बॉम्ब फेकणे ही एक सामान्य घटना बनत चालली आहे. २०२३ मध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना पाहायला मिळाली. यावर्षी देखील मुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे."

भाजपा नेते सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले की, "मुर्शिदाबादमध्ये एका विशिष्ट समुदायाने हल्ला केला होता. कारवाई करण्याऐवजी तेथे उपस्थित पोलिसांनी मिरवणुकीवरच अश्रुधुराचे नळकांडे डागले, जेणेकरून आरोपींना वाचवता येईल. माझी तुम्हाला (राज्यपाल) विनंती आहे की, तुम्ही प्रभावित भागांना भेट द्या आणि तेथील तणाव समजून घ्या, या प्रकरणाची NIA मार्फत चौकशी करण्यात यावी, कारण दगडफेकीसोबतच मिरवणुकीवर बॉम्बही फेकण्यात आले आहेत."

परिसरात कलम १४४ लागू 
दरम्यान, मुर्शिदाबादच्या शक्तीपूर भागात रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, ज्यात २० जण जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काही लोक आपल्या घराच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करत असल्याचे दिसत आहेत. मिरवणुकीदरम्यान स्फोट झाला, त्यात एक महिला जखमी झाली. हा बॉम्बस्फोट होता की अन्य काही कारणामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. 

Web Title: West Bengal Ram Navami clashes: Suvendu Adhikari demands NIA probe, EC action against Mamata 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.