West Bengal Politics: नाईलाज झाला! पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी रात्री २ वाजता बोलावले विधानसभा अधिवेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 17:50 IST2022-02-24T17:49:34+5:302022-02-24T17:50:44+5:30
West Bengal assembly session may Start after Midnight: राज्यपाल धनखड यांनी आज दुपारी राज्याचे मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र, हे अधिकारी राज्यपालांना भेटण्यासाठी गेले नाहीत. यामुळे राज्यपालांनी अधिवेशन सुरु करण्याची परवानगी देऊन टाकली.

West Bengal Politics: नाईलाज झाला! पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी रात्री २ वाजता बोलावले विधानसभा अधिवेशन
देशात कधीही घडले नाही अशी घटना पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ यांनी मध्यरात्री २ वाजल्यानंतर विधानसभेचे अधिवेशन बोलविले आहे. यासाठी त्यांचाही नाईलाज झाला आहे. कारणच तसे घडले आहे
पश्चिम बंगालचे ममता सरकार आणि धनखड यांच्यातील कलगीतुरा सर्वांना माहिती आहे. एकदा धनखड यांना भोजनाचे निमंत्रण देऊन ते अचानक रद्द करत विधानसभेचे दरवाजे बंद करण्यात आले होते. बऱ्याचदा धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्याच वाद होत असतात. एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न दोन्ही बाजुंकडून होत असतात. असाच प्रकार आज घडला आहे.
पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे अधिवेशन घेण्यासाठी राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावर चुकून दुपारी दोन ऐवजी रात्री २ असे टाईप झाले. म्हणजेच एम आणि पीएमने घोळ घातला. या प्रस्तावात ७ मार्च (सोमवार) दोन पीएम ऐवजी २ एएम टाईप झाले. या विषयावर राज्यपाल धनखड यांनी आज दुपारी राज्याचे मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र, हे अधिकारी राज्यपालांना भेटण्यासाठी गेले नाहीत. यामुळे राज्यपालांनी रात्री २ वाजल्यापासूनच अधिवेशन सुरु करण्याची परवानगी देऊन टाकली.
याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे कळविली आहे. मात्र, रात्री २ वाजता अधिवेशन सुरु करण्याचा प्रस्ताव त्यांनाही रुचलेला नाही, असे म्हटले आहे. या साऱ्या प्रकारानंतर पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली असून पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी यावर म्हटले की, फक्त टायपिंग मिस्टेक होती. राज्यपाल ती चूक दुरूस्त करू शकले असते. मात्र, त्यांनी मुद्दामहून रात्री २ वाजताची चूक तशीच ठेवल्याने आता रात्रीच अधिवेशन सुरु करावे लागणार आहे.
राज्यपालांना त्या आधी दोन प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यामध्ये दोन पीएम बरोबर गेले होते. तिसऱ्या प्रस्तावात चुकून 2:00 AM गेले, ते हे टाळू शकले असते, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला. जर आता रात्री विधानसभा अधिवेशन सुरु झाले तर तो देशातील पहिलाच असा प्रकार ठरणार आहे.