west bengal assembly election 2021 election commission calls an all party meeting on april 16 for review corona norms | West Bengal Election 2021: कोरोना परिस्थिती गंभीर; निवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठक

West Bengal Election 2021: कोरोना परिस्थिती गंभीर; निवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठक

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठकबंगालमध्ये कोरोना परिस्थिती गंभीरसोशल डिस्टन्सिंगसाठी १४४ कलम लावा - हायकोर्ट

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. येथे चार टप्प्यांसाठी मतदान पार पडले असून, आणखी चार टप्पांत मतदान होणार आहे. मात्र, दुसरीकडे देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी बंगाल निवडणुकांचा बोलबाला अधिक असून, प्रचारसभांच्या ठिकाणी कोरोनाचे कोणतेच नियम पाळले जात नसल्याचे समोर आले असून, यासंदर्भात निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. (election commission calls an all party meeting on april 16 for review corona norms)

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक रॅली, प्रचारसभा यांमध्ये कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवून कोलकाता उच्च न्यायालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राजकीय कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे होणारे पालन यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवार, १६ एप्रिल २०२१ रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांसंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

सोशल डिस्टन्सिंगसाठी १४४ कलम

जिल्हाधिकाऱ्यांनी गरज असेल, तेथे कोरोना नियमांचे पालन व्हावे, यासाठी कलम १४४ लागू करावे, असे निर्देशही दिले आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगावर असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यासह सर्वांनी मास्क घालणे आणि प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था असणे बंधनकारक असले पाहिजे. तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले पाहिजे, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. 

बंगालमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ

कोरोना संकटात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत असून, २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया सुरू आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. बंगालमध्येही कोरोनाची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. मंगळवारी बंगालमध्ये कोरोनाच्या ४ हजार ८१७ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली असून, २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये कोलकाता, उत्तर २४ परगणा येथील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. आतापर्यंत बंगालमध्ये एकूण ६ लाख २४ हजार २२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, १० हजार ४३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५ लाख ८४ हजार ७४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: west bengal assembly election 2021 election commission calls an all party meeting on april 16 for review corona norms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.