आपमध्ये साठमारी विकोपाला
By Admin | Updated: June 7, 2014 02:31 IST2014-06-06T21:44:12+5:302014-06-07T02:31:24+5:30
पराभवानंतर प्रथमच आम आदमी पार्टीच्या (आप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असताना पहिल्या फळीतील नेत्यांची भांडणे चव्हाट्यावर येत आहेत.

आपमध्ये साठमारी विकोपाला
केजरीवालांनाही विरोध : सिसोदिया- योगेंद्र यादव यांची एकमेकांवर आगपाखड
फराज अहमद/ नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच आम आदमी पार्टीच्या (आप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असताना पहिल्या फळीतील नेत्यांची भांडणे चव्हाट्यावर येत आहेत. खुद्द अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वालाही विरोध होत आहे.
मनीष सिसोदिया आणि योगेंद्र यादव यांनी शुक्रवारी परस्परांवर तोफ डागत संघर्षाची ठिणगी उडविली. यादव यांनी आपची राजकीय व्यवहार समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला असून त्यांनी केजरीवाल हे नेते नव्हे तर, पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून वागत असल्याचा आरोप एका पत्रात केला आहे. दुसरीकडे सिसोदिया यांनी पत्रात यादव हे हरियाणातील आपचे नेते नवीन जयहिंद यांच्यासोबतच्या संघर्षातून पक्षनेतृत्वाला या वादात ओढत असल्याचा आरोप केला.
देशभरात लढायचे नव्हते
लोकसभा निवडणुकीत देशभरात एवढ्या मोठ्या जागा लढविण्याला केजरीवाल यांचा ठाम नकार होता. काही वर्षे दिल्लीतील राजकारणावरच लक्ष केंद्रित करण्याची त्यांची इच्छा होती. योगेंद्र यादव आणि अन्य काही नेत्यांनी देशभरात लढण्यासाठी भाग पाडले. निकाल सर्वांसमोरच आहे, असेही सिसोदिया म्हणाले.
यादव हे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहात नसून त्याऐवजी ई-मेल पाठवत आहेत. या ई-मेलद्वारे त्यांना काय साध्य करायचे आहे. तुम्हाला पक्ष संपवायचा आहे काय? जयहिंद यांच्यासोबतच्या भांडणात तुम्हाला केजरीवालांना संपवायचे आहे काय? असा सवाल सिसोदिया यांनी केला आहे.
दमानियाही नाराज
अंजली दमानिया यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिला होता. आपच्या संसदीय व्यवहार समितीच्या सदस्य शाझिया इल्मी यांनी अलीकडेच केजरीवालांवर तोफ डागत राजीनामा दिला आहे. दमानिया यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त धडकले असतानाच त्यांची समजूत घालण्यात आली. त्यांच्यावर आता इल्मींचे मन वळविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते.
अमेठीत राहुल गांधींविरुद्ध निवडणूक लढवणारे कुमार विश्वास यांनी पक्ष कार्यकारिणीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते, मात्र आपचे प्रवक्ते नागेंद्र शर्मा यांनी त्याचा इन्कार केला.