नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातलेला असून, त्याचा प्रभाव वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच असल्यानं सरकारही चिंताक्रांत झालं आहे. त्यातच आता पाकिस्तानकडून भारताकडे नवं संकट येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. डिसेंबरचा हिवाळा आणि मार्चमध्ये पाऊस पडल्यानंतर आता एप्रिलचा उन्हाळादेखील नवा विक्रम नोंदवू शकतो, अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीचे कमाल तापमान 41 अंशाच्या वर गेले होते. उष्णतेचा ही लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शेजारील पाकिस्तानकडून येत असलेल्या उष्ण लाटांमुळे या महिन्यात तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. ही गरम हवा दिल्लीसह कोट्यवधी लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. केवळ दिल्लीच नव्हे तर उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहारमधील लोकांना या उष्म्याचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमधला हा तापमानाचा उच्चांक 29 एप्रिल 1941 या वर्षासारखाच आहे, जेव्हा कमाल तापमान 45.6 डिग्री सेल्सिअस एवढे नोंदवले गेले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णतेचा आलेख हळूहळू वाढत चालला आहे, पण दोन-तीन दिवसांपासून त्यानं वेग पकडल्याचं दिसत आहे. येत्या काही दिवसांत उत्तर भारताला तीव्र उष्णता आणि उष्मा सहन करावा लागू शकतो. एकंदरीत एप्रिलच्या शेवटी भारतात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा उत्तर-पश्चिमेकडून हवेच्या लहरी येत होत्या. पर्वतांवरील शीत लहरीदेखील त्याच्याबरोबर मिसळत होत्या. आता वाऱ्यानं दिशा बदललेली असून, तो दक्षिण-पश्चिमेकडून वाहत येतो आहे. त्यामुळे पाकिस्तानची उष्ण हवा राजस्थानमार्गे दिल्लीत पोहोचत आहे. कोणतंही प्रदूषण नसल्यानं ही उष्णतेची काहिली जाणवू लागली असून, आगामी काळात उष्णता आणि तापमानात झपाट्याने वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
पाकिस्तानमधून भारताकडे येतंय संकट; दिल्लीसह अनेक राज्यांतील जनतेचं टेन्शन वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:22 IST