संपत्ती कार्डामुळे गरिबी दूर होणार, पंतप्रधानांना विश्वास, आर्थिक उलाढालीस चालना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:22 IST2025-01-19T07:21:42+5:302025-01-19T07:22:37+5:30
शनिवारी ६५ लाख कार्डांचे वितरण करण्यात आल्याने गावांमधील जवळपास २.२४ कोटी लाभार्थ्यांकडे स्वामित्व संपत्ती कार्ड असेल.

संपत्ती कार्डामुळे गरिबी दूर होणार, पंतप्रधानांना विश्वास, आर्थिक उलाढालीस चालना
नवी दिल्ली : स्वामित्व संपत्ती कार्डमुळे केवळ आर्थिक उलाढालीला चालना मिळणार नसून गरिबी निर्मूलनासाठी मदत होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदींच्या हस्ते शनिवारी ६५ लाख स्वामित्व कार्डचे वाटप करण्यात आले. स्वामित्व संपत्ती कार्डमुळे कर्जासोबत सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत होणार असल्याचे लाभार्थ्यांशी संवाद साधताना मोदींनी स्पष्ट केले.
शनिवारी ६५ लाख कार्डांचे वितरण करण्यात आल्याने गावांमधील जवळपास २.२४ कोटी लाभार्थ्यांकडे स्वामित्व संपत्ती कार्ड असेल. संपत्तीचा अधिकार हा जगभर एक आव्हान असल्याचे स्पष्ट करत मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालाचा हवाला दिला.
पंतप्रधान म्हणाले की, अनेक देशांत लोकांकडे संपत्तीच्या अधिकारासाठी कायदेशीर दस्तऐवज नाहीत. गरिबी निर्मूलनासाठी हा अधिकार महत्त्वाचा असल्याचे यात म्हटले आहे. गावातील संपत्ती हे मृत भांडवल असल्याचे एका अर्थतज्ज्ञाने म्हटले कारण, या संपत्तीचा काही उपयोग करत नाहीत.
बँका देत नव्हत्या कर्ज
आजही आपल्या गावांतील हजारो लोकांकडे लाखो-कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, त्यांच्याकडे त्या संपत्तीचे कागदपत्रे नव्हती. त्यामुळे वाद होत होते. संपत्ती बळकावली जात होती. बँका कर्ज देत नव्हत्या.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अगोदरच्या सरकारने काहाही केले नसल्याचे नमूद करत मोदींनी अप्रत्यक्षरीत्या पूर्वीच्या काँग्रेस सरकारवर टीका केली. संपत्तीचा कायदेशीर अधिकार मिळाल्याने लाखो लोकांना कर्ज घेता आले.
या पैशाच्या माध्यमातून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. स्वामित्व कार्ड मिळालेल्यांमध्ये काही शेतकरी असून त्यांच्यासाठी हे कार्ड आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचा दावा मोदींनी केला.