नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. भारतानेपाकिस्तानविरुद्ध सिंधू करार रद्द करण्यासारखी अनेक मोठी पाऊले उचलली आहेत. यामुळे तणाव इतका वाढला आहे की, दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अशातच, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युरोपसह संपूर्ण जगाला एक थेट संदेश दिला आहे.
परराष्ट्र मंत्री युरोपवर का चिडले?भू-राजकीय मुद्द्यांवर भारताच्या भूमिकेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या युरोपीय देशांवर टीका करताना परराष्ट्रमंत्री म्हणाले की, भारताला मित्रांची गरज आहे, फक्त उपदेश देणाऱ्यांची नाही. भारताला परस्पर आदर आणि समजूतदारपणा दाखवणाऱ्या देशांसोबत काम करायचे आहे. काही युरोपीय देश अजूनही त्यांच्या मूल्ये आणि कृतींमधील दरीशी झुंजत आहेत. जेव्हा आपण जगाकडे पाहतो, तेव्हा आपण उपदेशकांचा नाही तर भागीदारांचा शोध घेतो. युरोप अजूनही या समस्येशी झुंजत आहे.
डॉ. जयशंकर पुढे म्हणाले, जर आपल्याला भागीदारी विकसित करायची असेल, तर काही समज, संवेदनशीलता, परस्पर हित आणि जग कसे कार्य करते, याची जाणीव असली पाहिजे. याचा अर्थ असा की, भागीदारी यशस्वी होण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या गरजा आणि हितसंबंध समजून घेतले पाहिजेत. भारत अशा देशांसोबत काम करू इच्छितो, जे परस्पर आदर आणि समजूतदारपणा दाखवतात. युरोपच्या समस्या संपूर्ण जगाच्या समस्या आहेत, परंतु संपूर्ण जगाच्या समस्या युरोपच्या समस्या नाहीत, या मानसिकतेतून युरोपला बाहेर यावे लागेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.